नवी दिल्ली ः शेतकरी आंदोलनाला परदेशी सेलिब्रिटींनी दिलेल्या पाठिंब्यानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ट्विटरवर सुरू असलेल्या ट्रेंड युद्धात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढे आले आहेत. कोणताही अपप्रचार देशाची एकता तोडू शकत नाही, असं ट्विट करून त्यांनी पलटवार केला आहे. एकत्रितरित्या प्रगतीकडे वाटचाल करू. कोणताही अपप्रचार भारताला उंचीवर जाण्यापासून रोखू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
परराष्ट्र व्यवहार प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांच्या ट्विटवर अमित शहा यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी
#IndiaAgainstPropaganda, #IndiaTogether या हॅशटॅगचाही उल्लेख केला आहे.
दिल्लीच्या सीमाभागात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटींनी टिप्पणी केली आहे. पॉपस्टार रिहाना, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आपण याबाबत का बोलत नाही आहोत ? असं ट्विट पॉपस्टार रिहाना यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केलं होतं. भारतातील शेतक-याच्या आंदोलनामागे आम्ही एकत्रिरित्या उभे आहोत, असं पर्यावरणवादी ग्रोटा थनबर्ग यांनी ट्विट केलं होतं.
आंदोलनाबाबत माहिती घेऊन बोला…
शेतकरी आंदोलनावर परदेशी सेलिब्रिटींनी केलेल्या टिपण्णीवर केंद्र सरकारनं कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. कृषी कायद्यावरून समाज माध्यमांवरील सनसनाटी मीडिया हॅशटॅग आणि टिप्पण्यांच्या लालसेतून भारताच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करणारी व माहिती न घेताच केलेली आक्षेपार्ह वक्तव्ये थांबवावीत. असं सरकारनं प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटलं आहे. माहिती न घेताच बोलणं योग्य नाही. भारताच्या संसदेनं पूर्ण चर्चा करून कृषी सुधारणा कायदे मंजूर केले आहेत, असं सरकारनं प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटी सरकारच्या समर्थनासाठी आले पुढे
पॉपस्टार रिहाना यांच्या ट्विटनंतर अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अजय देवगण, करण जोहर यांनी इंडिया टुगेदर या हॅशटॅगद्वारे केंद्राच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. परदेशी सेलिब्रिटींच्या आंदोलनाबाबतच्या प्रतिक्रिया अपप्रचार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.