नवी दिल्ली – कृषी कायद्यांवरुन शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाची दखल घेत आता देशातील मोदी विरोधकांनी एकत्र मोट बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच मोदी सरकारला घेरण्यासाठी बुधवारी (९ डिसेंबर) सर्व विरोधक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहूल गांधी, माकप नेते सीताराम येचुरी आदी विरोधी पक्ष नेत्यांची बुधवारी सर्वप्रथम बैठक होणार आहे. त्यात कृषी कायद्यांबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच, विरोधकांची ठोस आणि आक्रमक भूमिका काय असावी याचा निर्णयही या बैठकीत घेतला जाणार आहे. त्यानंतर हे सर्व विरोधी पक्ष नेते राष्ट्रपती भवनात सायंकाळच्या सुमारास जाणार आहेत. तेथे ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील. शेतकऱ्यांचे आंदोलन, तिन्ही कृषी कायदे आणि सद्यस्थिती याविषयी ते राष्ट्रपतींशी चर्चा करणार आहेत. तसेच, आपल्या मागण्यांचे निवेदन ते राष्ट्रपतींना देणार आहेत.
आंदोलक-सरकार चर्चेची फेरीही आज
राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस वाढतच आहे. याच अंतर्गत ८ डिसेंबर रोजी देशव्यापी भारत बंद आंदोलनही करण्यात आले. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. यापूर्वी शेतकरी आंदोलक आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या फेऱ्या झाल्या. पण, त्यात ठोस निर्णय झाला नाही. तिन्ही कृषी कायदे पूर्णपणे मागे घ्यावेत, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांची आहे. तर, कायदे मागे घेतले जाणार नाही त्यात हवे तर सुधारणा करता येतील, असे केंद्र सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे हा तिढा आद्याप सुटू शकलेला नाही.