नवी दिल्ली – संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात आज तीन कृषी कायद्यांच्या मुद्यावरुन वारंवार व्यत्यय आला. हे कायदे रद्द करा, या मागणीचा विरोधी पक्ष सदस्यांनी राज्यसभेत पुनरुच्चार केला. शेतकरी विरोधात संघर्ष असायला नको, असं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेत दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्रात विरोधी पक्षनेता गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं. राज्यसभेत सकाळी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून चर्चा सुरु झाली. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसक घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली, निपक्षपाती चौकशी करायची मागणी बीजीडीनं लावून धरली.
तीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे आज लोकसभेचं कामकाज वारंवार तहकूब झालं. दुपारी कामकाज सुरु झालं तेव्हा काँग्रेस, द्रमुक, टीएमसी, डावे पक्ष, सपा आणि इतर पक्ष सदस्यांनी हौद्यात येऊन सरकारविरोधी घोषणा दिल्या. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी शिस्तपालनाचं आवाहन करूनही गदारोळ सुरुच राहिला. प्रश्नोत्तराचा तासही त्यामुळे वाया गेला. आधी संध्याकाळी साडेचार, त्यानंतर पाच आणि त्यानंतर सातपर्यंत कामकाज तहकूब करावं लागलं.