नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत विकास निधी अंतर्गत वित्तपुरवठा सुविधेच्या केंद्रीय क्षेत्र योजनेचा शुभारंभ केला. ही योजना शेतकरी, प्राथमिक कृषी पत संस्था (पीएसीएस ), शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ ), कृषी-उद्योजक इत्यादींना सामुदायिक शेतीची मालमत्ता आणि कापणीनंतरची कृषी पायाभूत सुविधा उभारण्यात मदत करेल. या मालमत्तांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना अधिक मूल्य मिळू शकेल कारण ते शेतमालाचा साथ करून वाढीव दराने विक्री करू शकतील, नासाडी कमी होईल आणि प्रक्रिया वाढेल तसेच मूल्यवर्धन होईल.
मंत्रिमंडळाने या योजनेला औपचारिक मान्यता दिल्यानंतर केवळ ३० दिवसात १ हजार कोटी रुपयांचा पहिला हप्ता २ हदार २८० पेक्षा अधिक शेतकरी संस्थांना देण्यात आला. हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आला आणि देशभरातून लाखो शेतकरी, एफपीओ, सहकारी संस्था , पीएसीएस आणि नागरिक यात सहभागी झाले होते.
याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी पीएम-किसान योजनेअंतर्गत १७ हजार कोटी कोटी रुपयांचा सहावा हप्ता सुमारे ८.५ कोटी शेतकऱ्यांना जारी केला. हे पैसे थेट त्यांच्या आधार सत्यापित बँक खात्यात बटणाची कळ दाबून हस्तांतरित करण्यात आले. या हस्तांतरणासह, १ डिसेंबर २०१८ रोजी सुरु झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत १० कोटीहून अधिक शेतकर्यांच्या हाती ९० हजार कोटी रुपये देण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले.