त्र्यंबकेश्वर – राज्याचे कृषीमंत्री हे नाशिक जिल्ह्याचे आहेत आणि त्यांच्याच जिल्ह्यात रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा असल्याची बाब समोर येत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात रासायनिक खतांचा कृत्रीम तुटवडा निर्माण करून चढ्या दराने खत विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याकडे ग्राहक पंचायतीने लक्ष वेधले आहे.
ग्राहक पंचायतीचे जिल्हा सदस्य नरेंद्र पेंडोळे आणि तालुका संघटक अमर सोनवणे यांनी तालुका कृषि अधिकारी यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शेतक-यांची सध्या आर्थिक लूट आणि फसवणूक होत आहे. त्र्यंबक तालुक्यात असलेल्या रासायनिक खते विक्री दुकानदारांची नावे, त्यांच्याकडे असलेल्या खतांचा स्टॉक आणि खतांची रास्त किंमत यांची दर आठवड्याला यादी प्रसिध्द करून ती सोशल मिडीयावर टाकण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. त्र्यंबक तालुक्यात रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. दुकानदार त्यांना हवे त्या कंपनीची खते विकतात व जादा किंमत घेतात. खतांचा दर्जा प्रमाणित असतोच, असे नाही. शेतकरी याबाबत तक्रार करत असल्याने ग्राहक पंचायतीने निवेदन दिले आहे. याप्रकरणी सरकारने वेळीच लक्ष दिले नाही तर ग्राहक न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. या पत्राच्या प्रती कृषीमंत्री आणि तहसीलदार यांना पाठविण्यात आल्या आहेत.