नाशिक – शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी देण्याकरिता आणि त्यांची कृषी पंपाच्या थकबाकी मधून मुक्ती करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या नवीन कृषी पंप वीज जोडणी व वसूली धोरणाच्या यशस्वीतेसाठी महावितरणच्या वतीने राज्यभर नियोजन करण्यात येत असून या धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी या धोरणाची गतिमानतेने तथा प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गीते यांनी दिले. नाशिक मंडळातील लासलगाव उपविभागातील विंचूर कक्ष कार्यालयात दिनांक १३ फेब्रुवारी रोजी शनिवारी लासलगाव व निफाड उपविभागातील सर्व अभियंते ,जनमित्र व कर्मचारी यांच्या घेतलेल्या सविस्तर बैठकीत त्यांनी निर्देश दिले आहेत.
या बैठकीस नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे,नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता प्रविण दरोली, लासलगावचे उपकार्यकारी अभियंता प्रविण सोनवणे निफाडचे उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना नवीन कृषी पंप वीज जोडणी धोरणाची वैशिष्ट्ये सर्व संबंधित ग्राहकांपर्यंत पोहचवून यामध्ये थकबाकी वसुली करणाऱ्यांसाठी नव्या धोरणात विविध प्रोत्साहनपर योजनांचा समावेश असून थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या क्षेत्रामधील विजेच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी पायाभूत योजना निर्माण करण्यात येवून नवीन रोहित्रे व यंत्रणेची दुरुस्ती,कृषी ग्राहकांना टप्प्याटप्प्याने कायमस्वरुपी दिवसा ८ तास वीजपुरवठा मिळावा हा मुख्य हेतू आहे. यासंदर्भात महावितरणने ऍप तयार केले असून याचा कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी वापर करून ही योजना सर्व घटकांना सोबत घेऊन राबविण्याचे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गीते यांनी केले. यावेळी लासलगाव व निफाड उपविभागातील अभियंते व जनमित्रांशी त्यांनी वैयक्तिक थेट संवाद साधला. यावेळी मुख्य अभियंता रंजना पगारे, अधिक्षक अभियंता प्रविण दरोली यांनी सुद्धा संवाद साधीत ही योजना नाशिक परिमंडळात प्रत्येक घटकापर्यंत पोहचवून यशस्वी करण्याचे यावेळी आश्वासीत केले.