नाशिक – कृषी पंप वीज जोडणी तथा थकबाकी वसुली  धोरण २०२० च्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने वीजजोडणी देणे, वीजबिलातील थकबाकीवरील व्याज व विलंब शुल्कात सवलत मिळणार असून, या माध्यमातून सवलतीनंतर पहिल्या वर्षी उर्वरित ५० टक्के थकबाकी भरल्यास राहिलेली बिलाची रक्कम माफ होणार आहे. शेतक-यांनी या योजनेस प्रतिसाद द्यावा, तसेच महावितरणने  या योजनेची  माहिती व लाभ शेतक-यांपर्यंत पोहचवून नाशिक परिमंडळात गतिमानतेने राबवून  यशस्वी करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले .
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे कार्यालय, विद्युत भवन येथे आज बुधवारी प्रथमच  भेट दिली. यावेळी  परिमंडळातील विद्युत विकास कामे व योजना याबाबत आढावा घेऊन चर्चा केली, यावेळी ते बोलत होते.  मुख्य अभियंता रंजना पगारे यांनी पुष्पगुच्छ देऊन  मंत्री महोदयांचे  स्वागत केले.
कृषिपंप वीजजोडणी धोरणा योजनेअंतर्गत ग्राहकाने भरणा केलेल्या रकमेपैकी ३३ टक्के रक्कम  ग्राहकाच्या ग्रामपंचायत क्षेत्रामधील विजेच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी वापरली जाणार आहे.तसेच ग्राहकाच्या भरणा रकमेपैकी आणखी ३३ टक्के रक्कम ही ग्राहकाच्या जिल्ह्यातील विजेच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी वापरली जाणार आहे.संपूर्ण कृषी क्षेत्राचा कायापालट करणाऱ्या या धोरणाचा व योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी पायाभूत आराखड्याचे अधिक्षक अभियंता संजय खंडारे यांनी  लिहिलेल्या महावितरणमधील  विविध योजना, परिपत्रके, केंद्रीय वीज कायदा आणि नियम याची विस्तृत माहिती असलेल्या  “इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन प्रोजेक्ट मॅनेजमेण्ट अँड प्रॅक्टिसेस” पुस्तकाचे प्रकाशन  ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे हस्ते करण्यात आले.  यावेळी विविध संघटनांनी पुष्पगुच्छ देऊन ऊर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांचे स्वागत केले. बैठकीला  मुख्य अभियंता रंजना पगारे, अधिक्षक अभियंते संजय खंडारे, प्रविण दरोली, संतोष सांगळे आणि रमेश सानप,  सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं) महेश बुरंगे, कार्यकारी अभियंते धनंजय आहेर, धंनजय दिक्षीत,राजाराम डोंगरे, मनीष ठाकरे, निलेश चालिकवार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले,सहाय्यक विधी अधिकारी प्रशांत लहाने, प्रणाली विश्लेषक राजेंद्र सोनवणे, जनसंपर्क अधिकारी विकास विकास आढे यांच्यासह अभियंते, अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.
 
			








