नाशिक – नटसम्राट हे नाटक सांस्कृतिक ठेवा असून आजच्या सुवर्ण महोत्सवी दिवशी देखील त्याचे गारूड रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांनी केले.
कुसुमाग्रज मराठी विचार मंचतर्फे नटसम्राटच्या पहिल्या प्रयोगाच्या सुवर्ण महोत्सवी दिनानिमित्त आयोजित स्वगत स्पर्धेच्या पारितोषक वितरण समारंभ कालिदास कलामंदिर येथे संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष सतीश बोरा, उपाध्यक्ष आनंद देशपांडे, सरचिटणीस दिलीप बारावकर, सुभाष सबनीस, शाम पाडेकर, श्रीधर व्यवहारे, डॉ. स्वप्नील तोरणे, मिलिंद कुलकर्णी, मुक्तेश्वर मुंशेट्टिवार, श्रीमती वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
नटसम्राट मध्ये भूमिका करायची स्वप्ने प्रत्येक कलाकार बघत असतो. मोहिनी घालणारे हे नाटक वाचकांवर, प्रेक्षकांवर संस्कार करीत आहे असे त्यांनी सांगितले.
विचार मंच चे अध्यक्ष सतीश बोरा यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या स्थापनेचा उद्देश स्पष्ट करून सांगितला. नव्या पिढीला तात्यासाहेबांनी दिलेले प्रेरणादायी विचार पोहोचवण्यासाठी मंचाची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगितले. संस्थेमार्फत केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल त्यांनी माहिती दिली. स्पर्धेचे संयोजक शाम पाडेकर यांनी स्पर्धेच्या संयोजना मागील प्रक्रिया विशद करून सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. उपाध्यक्ष आनंद देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले. सरचिटणीस दिलिप बारावकर यांनी उपेंद्र दाते यांचा परिचय करून दिला.
विवेकानंद दासरी यांनी स्पर्धकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. त्यांनी पारितोषिकाची रक्कम संस्थेला देणगी दिली.
या प्रसंगी स्पर्धेतील पारितोषिक विजेते कु. युगा मिलिंद कुलकर्णी, कु. गार्गी सचि ब्राह्मणकर, कु. वेदिका पंचभाई, श्री. तुकाराम नाईक आणि नटसम्राट उपेंद्र दाते यांनी नटसम्राट मधील स्वगतांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक, रंगकर्मी उपस्थित होते. शासनाच्या कोविड निर्देशांचे पालन याप्रसंगी करण्यात आले होते.