नाशिक – ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’तर्फे दिला जाणारा मानाचा ‘जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर करण्यात आला आहे. कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या दिवशी २७ फेब्रुवारीला हा पुरस्कार कर्णिक यांना प्रदान केला जाणार आहे. साहित्यिकांना मराठी साहित्यातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. मराठी साहित्यातील हा सर्वोच्च पुरस्कार गणला जातो.
जनस्थान पुरस्कार निवड समितीने मधु मंगेश कर्णिक यांची निवड केली. १ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या १० मार्चला सन्मान सोहळा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विचार करून ठिकाण आणि इतर गोष्टी ठरवल्या जाणार असल्याचे प्रतिष्ठानने सांगितले आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे १९९१ पासून जनस्थान हा द्वैवार्षिक पुरस्कार देण्यात येतो. यंदा पुरस्काराचे १७ वे वर्ष आहे. २०१९ मध्ये हा पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांना प्रदान करण्यात आला होता.
आतापर्यंत देण्यात आलेले पुरस्कार असे
- २०१९: वसंत आबाजी डहाके
- २०१७: डॅा. विजया राजाध्यक्ष .
- २०१५: अरुण साधू
- २०१३: भालचंद्र नेमाडे
- २०११: महेश एलकुंचवार
- २००९: ना. धों महानोर
- २००७: बाबूराव बागूल
- २००५: नारायण सुर्वे
- २००३: मंगेश पाडगावकर
- २००१: श्री. ना. पेंडसे
- १९९९: व्यंकटेश माडगूळकर
- १९९७: गांगाधर गाडगीळ
- १९९५: इंदिरा संत
- १९९३: विंदा करंदीकर
- १९९१: विजय तेंडूलकर