मुंबई – वरुण धवन आणि सारा अली खान यांचा ‘कुली नंबर १’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र चित्रपट लोकांच्या काही खास पचनी पडलेला दिसत नाही. कदाचित याच कारणामुळे चित्रपटाची सोशल मिडीयावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.
चित्रपटातील एक सीन तर लोकांच्या खास निशाण्यावर आहे. या सीन मध्ये वरुण धवन रेल्वे रुळाच्या मधोमध खेळत असलेल्या एका लहान मुलाचा जीव वाचवतो असे दाखवले गेले आहे. लहान मुलगा रुळाच्या मधोमध बसलेला आहे आणि ट्रेन फुल स्पीडमध्ये त्याच रुळावरून येत आहे हे वरून धवनला रेल्वे स्टेशनवरील एका पादचारी पुलावरून दिसते. इतक्या उंच पुलावरून हिरो सरळ चालत्या ट्रेनच्या एका बोगीवर उडी घेतो. आणि ट्रेन सुरु असताना ट्रेनपेक्षा अधिक वेगाने ट्रेनच्या बोगीवरून धावत जातो. धावत धावत ट्रेनच्या इंजिनपर्यंत पोचतो आणि इंजिन च्या पुढे उडी घेऊन लहान मुलाला वाचवतो असा सीन आहे. अतिशयोक्तीची सीमा पार करणारा हा सीन पाहून लोक त्याची खूप खिल्ली उडवताना दिसत आहेत.
एका युजरने लिहिले आहे की ‘भौतिकशास्त्राला श्रद्धांजली वाहतो. पहिली गोष्ट जेव्हा धावत्या ट्रेनवर उडी घेतली तेव्हा पुढच्या बाजूला कसा काय पडला? जेव्हा याने इंजिनावरून उडी मारली तेव्हा ट्रेन मुलापासून जवळपास २ मीटर दूर होती. १०० च्या स्पीडने जरी धावले तरी २ मीटर अंतर पार करायला ०.०७ सेकंद लागतात. म्हणजे या माणसाने ०.०७ सेकंदापेक्षा कमी वेळात उडी घेऊन, मुलाला वाचवून बाजुलाही उडी घेतली. रेस्ट इन पीस फिजिक्स’
दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की ‘हे तर काहीच नाही. रजनीकांत असता तर रूळ मागे ओढून ट्रेनला तिथेच थांबवले असते.’. एकाने लिहिलंय की या एका सीन ने लॉजिक, फिजिक्स, कॉमन सेन्स आणि रोहित शेट्टी या सगळ्यांना मागे टाकलंय’
वरुण धवनचा कुली नंबर वन चा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झालेल्या गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या कुली नंबर वन चा रिमेक आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनीच केले असून यात वरुण धवनबरोबर सारा अली खान मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय परेश रावल, राजपाल यादव, जावेद जाफरी, शिखा तलसानिया, साहिल वैद हे वेगवेगळ्या भूमिकेत आहेत.