ठाणे – येथील कसारा भागात कुत्र्यावर भीषण ऍसिड हल्ला करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. यात कुत्र्याला दोन्ही पाय गमावावे लागले. ऍसिडचा प्रभाव इतका प्रचंड होता की त्याचे दोन्ही पाय निकामी झाले असून शरीरापासून ते वेगळे करण्यात आले आहेत. पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (पेटा) यांच्या हस्तक्षेपानंतर, कसारा पोलिसांनी कयूम खान आणि त्याची पत्नी आफरीन यांच्यावर कुत्र्यावर अॅसिडने हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेकदा कुत्रा संशयित जोडप्याच्या घराजवळ बसलेला असायचा. त्यामुळे त्याचे तेथे थांबणे त्यांना आवडत नव्हते, तत्काळ ठाणे ग्रामिक पोलिसांना याबाबत माहिती दिली, अशी माहिती पेटाच्या कार्यकर्त्यांनी दिली. सदर ऍसिड हल्ल्यात कुत्र्याच्या कानाला इजा झाली असून त्यावर पुढील उपचार नाशिक येथील शरण फॉर अॅनिमल्स एनजीओ येथे करण्यात येत आहेत. कसारा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ४२९ अन्वये एफआयआर दाखल केले आहे. तसेच क्रुअल्टी टू अॅनिमल (पीसीए) अधिनियम, १९६० च्या कलम ११ (१) (ए) आणि (एल); आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम ११९ अन्वये प्राण्याला अपंग ठेवण्यास मनाई असून त्यानुसार गुन्हेगारास दंड आणि पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.