चंदीगड – कोर्टात अनेक प्रकरणे निकालासाठी येतात. संशयित आरोपीला जामीन मिळण्यासाठी काही वेळा कोर्टाकडून वेगवेगळ्या अटी घातल्या जातात. चंदीगडमध्येही अशीच एक घटना घडली आहे. ज्यात उच्च न्यायालयाने आरोपीसमोर अशी अट ठेवली की, जर कुत्र्याला घराबाहेर काढले नाही (म्हणजे कुत्र्याला घरातच बांधून ठेवावे) तरच त्याला तुरूंगातून बाहेर येण्यास जामीन देण्यात येईल. कुत्रा घराबाहेर काढल्यास तक्रारदार जामीन रद्द करण्यासाठी पुन्हा अर्ज दाखल करु शकतो.
याबाबतची मजेशीर आणि दुर्देवी घटना अशी की, एका याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, झज्जरच्या बहादूरगड येथे राहणाऱ्या नवीन या गृहस्थाचे कुत्रा रस्त्यावर फिरवल्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या विकास या व्यक्तीशी भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की, नवीन याने चक्क गोळीबार केला आणि त्यात विकास आणि त्याची पत्नी जखमी झाली. त्यानंतर विकासच्या तक्रारीवरून पोलिसांनी नवीन, त्याचा भाऊ आणि वडील यांच्याविरूद्ध प्राणघातक हल्ला, धमकी आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.
तक्रारदार विकास यांनी पोलिसांना सांगितले की, नवीन कुटूंबियांनी रस्त्यावर कुत्रा फिरवल्याबद्दल व कुत्र्याने रस्त्यातच घाण केल्याबद्दल आम्ही आक्षेप नोंदविला होता. यानंतर दोन्ही बाजूने हाणामारी झाली आणि आरोपी नवीन यांनी गोळीबार केला. त्याच दिवशी पोलिसांनी आरोपीला अटक केली. संबंधित आरोपीच्या वकिलाने सांगितले की, फिर्यादीने आरोपीच्या भावाला मारहाण केली आणि स्वत: चा बचाव म्हणून आरोपीने परवाना पिस्तूलने बचावासाठी गोळी झाडली.
दरम्यान, या प्रकरणी हायकोर्टाने म्हटले आहे की, दोषी कोण आहे याचा निकाल खटल्या दरम्यान घेण्यात येईल परंतु याचिकाकर्ता मे पासून पोलिसांच्या ताब्यात आहे आणि तपास पूर्ण झाला आहे. अशावेळी याचिकाकर्त्याला जामिनाचा लाभ देता येईल. मात्र यासाठी उच्च न्यायालयाने तीन अटी ठेवल्या. याचिकाकर्ता विकास आणि त्यांची पत्नी सुनीता यांना १५ दिवसांच्या आत उपचारांसाठी ५० हजार रुपये देण्यात यावे, तसेच सदर प्रकरण संपेपर्यंत पोलिसांकडे शस्त्रे राहतील. तिसरी आणि सर्वात आगळीवेगळी अट अशी होती की, याचिकाकर्ता आपल्या कुत्र्याला फिरण्यासाठी आणि घाण करण्यासाठी (स्टूलिंगसाठी ) रस्त्यावर घेऊन जाणार नाही. म्हणजे त्याला घरातच बांधून ठेवावे. तेव्हाच त्याला जामीन मिळेल.