नवी दिल्ली – मानवानंतर कोरोना विषाणूच्या संसर्गाची बाधा प्राण्यांना देखील होते, असे एका नव्या अभ्यासामध्ये स्पष्ट झाले आहे. या अभ्यासामध्ये दहा वेगवेगळ्या प्रजातींचे विषाणूंच्या संवेदनाक्षमतेचे विश्लेषण केले गेले. यानुसार मांजरी आणि कुत्र्यासारख्या प्राण्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.
‘पीएलओएस कॉम्प्यूटेशनल बायोलॉजी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासाच्या निष्कर्षात असे आढळले आहे की, मानवांपेक्षा बदके, उंदीर, डुकरांना आणि कोंबडी यांना लागण होण्याची शक्यता फार कमी आहे, तर याउलट मांजरी, ऑयस्टर आणि कुत्र्यांना सीओव्ही-२ संसर्गाचा धोका जास्त दिसून आला. स्पेनच्या बार्सिलोना येथील सेंटर फॉर जेनोमिक रेग्युलेशन (सीआरजी) चे सह-लेखक लुईस सेरानो यांनी सांगितले की, या शास्त्रज्ञांना काही मांजरी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आजारी झाल्याचे दिसून आले. काही पाळीव प्राण्यांमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण कमी-अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या अभ्यासामध्ये, वैज्ञानिकांनी संगणक मॉडेलिंगचा उपयोग करून कोरोना विषाणू हे स्पाइक प्रथिने विविध प्राण्यांच्या पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी कसा उपयोग करते याचे परीक्षण केले.