नवी दिल्ली ः महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पुन्हा एकदा प्रतिबंध लावण्यात आला आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागपूरपाठोपाठ आता परभणीमध्येही लॉकडाउन लावण्यात आलं आहे. पुण्यात जिल्हा प्रशासनानं अनेक मार्गदर्शक सूचना जाहीर करत ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात शुक्रवारी कोरोनाचे नवे १५,८२७ रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये ५६ लोकांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे.
राज्यात या जिल्ह्यात प्रतिबंध
पुणे जिल्हा प्रशासनानं जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट रात्री लवकर बंद करावे लागतील. मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं, नागपूरनंतर आता परभणी जिल्ह्यात लॉकाडाउन लावण्यात आलं आहे. मागच्या महिन्यात अमरावती जिल्ह्यात लॉकडाउन लावण्यात आलं होतं.
एका दिवसात १५ हजारांहून अधिक नवे रुग्ण
महाराष्ट्रात शुक्रवारी १५,८१७ नवे रुग्ण आढळले असून ५६ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये पंधरा हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. राज्यात आतापर्यंत २२.८२ लाख रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये ५२,७२३ लोकांचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यात एका दिवसात ९३७ रुग्ण आढळले असून ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात २,८४० नवे रुग्ण आढळले असून १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
या जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना
राज्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाशिक, ठाणे, औरंगाबादसह अनेक जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या जिल्ह्यांत शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. मुंबईत लॉकडाउन लावलं नसलं तरी मास्क न घालणार्यांना दंड करण्यात येत आहे. पंजाबमध्येही कोरोनारुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पतियालामध्ये रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे.
पंजाबमध्ये शाळा, महाविद्यालये बंद
पंजाबमध्ये संसर्गाचा वेगानं फैलाव होत असल्यानं नर्सरी ते १२ वी पर्यंतच्या सर्व शाळा बंद केल्या आहेत. पंजाबच्या शिक्षणमंत्री विजय इंदर सिंगला म्हणाले, विद्यार्थ्यांचे पेपर आणि वाढत्या रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या काळात परीक्षा सुरूच राहतील. पंजाबमध्ये रुग्णांची संख्या १० हजारांच्यावर गेली आहे.
दिल्लीतही रुग्ण वाढले
देशाची राजधानी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. शुक्रवारी ४३१ नवे रुग्ण आढळले असून ही संख्या गेल्या ६२ दिवसांमधली सर्वाधिक आहे. यापूर्वी ९ जानेवारीला ५१९ रुग्ण आढळले होते. गेल्या २४ तासात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये आता एकूण ६ लाख ४२ हजार ८७० रुग्ण आढळले आहेत.
देशातील ७८ दिवसांतला विक्रम मोडला
देशात गेल्या २४ तासात नव्या कोरोनारुग्ण संख्येमुळे ७८ दिवसातील विक्रम मागे पडला आहे. देशात एका दिवसात २३,२८५ नवे रुग्ण आढळले आहेत. संसर्ग झालेल्या लोकांचा आकडा १,१३,०८,८४६ वर गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, यापूर्वी २४ डिसेंबरमध्ये एका दिवसात २४,७१२ रुग्ण आढळले होते. गेल्या २४ तासात ११७ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे हा आकडा वाढून १,५८,३०६ झाला आहे.