नाशिक : किराणाचे होलसेल दुकान फोडून रोकडवर डल्ला मारणा-या चोरट्यास अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. शाह यांनी अडीच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना पेठरोडवरील दत्तनगर भागात घडली होती. हसन हमजा कुट्टी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राजवर्धन दिलीप नेरकर (२४, रा. जाणता राजा कॉलनी, दत्तनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. नेरकर यांचे आपल्या राहत्या इमारतीच्या गाळय़ात मेसर्स राजवर्धन दिलीप नेरकर अॅण्ड कंपनी नावाचे होलसेल किराणा मालाचे दुकान आहे. ३ आॅगष्ट २०१८ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून गल्यातील ७३ हजार ८०० रूपयांची रोकड लांबविली होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे यांनी केला. आरोपीस अटक करून त्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे ए. बी. कारंडे यांनी काम पाहिले. फिर्यादी,साक्षीदार आणि पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेला परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने वेगवेगळया कलमान्वये प्रत्येकी अडीच वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दहा दिवसांचा साधा कारावासाबाबत निकाल पत्रात नमुद करण्यात आले आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार डी. एस. काकड यांनी कामकाज पाहिले.