विशाखा देशमुख, जळगाव
……
पंडित भीमसेन जोशी हे संगीतातील जाणकारांना कानाच्या पाळीला हात लावायला लावणारे गायक होते. तेवढेच गाणं न कळणाऱ्या रसिकाला, आपल्याला गाणं कळतंय असं वाटायला लावणारे, नव्हे, तसा विश्वास देणारे गायक होते. कर्नाटकातील गदग गावात ४ फेब्रुवारी १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे पिता गुरुराज जोशी हे शिक्षक होते. पंडितजी भावंडात सर्वात मोठे होते. त्यांनी उच्च शिक्षण घ्यावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. बालपणापासून त्यांना संगीताची आवड. संगीताप्रती असलेल्या आवडीतूनच त्यांना वडिलांविरुद्ध बंड करण्यात मनाने भाग पाडले. मनाचा कौल मानून ते संगीत शारदेचे उपासक झाले.
भारदस्त आवाज, बाणेदार ताना, आणि प्रतिभासंपन्न लयकारीने संपूर्ण भारतातील रसिकांना मोहिनी घालणारे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी म्हणजे किराणा घराण्याचा तळपता सूर्य. १९३६ ते १९४० हा कालखंड युवा भीमसेनच्या कठोर संगीत साधनेचा होता. सवाई गंधर्वकडे राहून त्यांनी शिकायला सुरुवात केली. दोन मैलांवर असलेल्या नदीवरून कावडीने पाणी भरणे, गुरुगृही पडेल ती कामे करणे व गाण्याच्या शिकवणीला बसणे असा दिनक्रम असे. बाल भीमसेनचे वडील गुरुराज यांनी केलेले वर्णन असे,आम्ही गुरुजींकडे निघालो तेव्हा काहीही न बोलणारा भीमसेन सत्याच्या जवळ पोहोचल्या सारखा निर्धाराने पावले टाकत होता. पुण्यात सवाई गंधर्व स्मारक पंडितजींनी उभे केले त्यावेळी स्वतः पंडितजींनी ही आठवण सांगितली.
पंडितजींचे सारं काही प्रचंड होतं. त्यांचं गाणं, स्टॅमिना, रियाज सार प्रचंड.. म्हणूनच ते शास्त्रीय संगीतातील बादशहा होते. दरबारी हा त्यांचा पेटंट राग. दरबारी आणि मारवा यासाठी जो आवाज लागतो त्यावर पंडितजी व आमिरखा यांची छाप आहे. देशभरात खूप मोठे उत्सव असायचे त्यात पहिले नाव भीमसेन जोशींचे असे. कारण तिकीट विक्री होण्यासाठी त्यांचे नाव महत्त्वाचे ठरत असे. पणजीला एका कार्यक्रमाच्या वेळी ३०० तिकिटे खपतील असा आयोजकांचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात बाराशे तिकिटांची मागणी आल्यावर हाताने तिकिटे लिहून द्यावे लागले. त्यांना प्रचंड मागणी होती त्यांच्या स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध होत असत. ज्यांना संगीतातले काही कळत नाही त्यांनाही त्यांचे स्वर बांधून ठेवत. त्यांची बैठक कधी पडली असे होत नसे.
इंद्रायणी काठी, विठ्ठलाच्या पायी थरारली वीट यासह संतवाणी यातील कोणताही अभंग रसिकांना आपलासा करतो. भक्तिगीत गायनात आपल्या आवाजाचा, सूरांचा आणि शब्दोच्चारांचा वापर केवळ भक्ती साठीच आहे हे तत्व पक्के करून त्यांनी अभंग गायनाला एक वळण लावले, म्हणूनच त्यांचे अभंग घराघरात पोहोचले, अजरामर झाले. मिले सुर मेरा तुम्हारा मुळे घराघरात पोहोचलेले भीमसेन जोशी कलावंत तर होतेच पण कलावंतपणा पेक्षाही त्यांनी जीवनात माणूसकीला महत्त्व दिले. स्वर्गीय कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे पु.ल देशपांडे,नाशिकचे वसंत पोतदार यांच्याशी अशी मैत्री जगले की असे अपूर्व उदाहरण नाही. त्यांनी प्रत्येकावर स्वतःला विसरून प्रेम केले. पण आपल्या निर्जीव चारचाकी गाडीवर देखील अपत्यवत प्रेम केले.शिष्य घडवण्याची फार मोठी धडपड त्यांनी केली.उपेंद्र भट, आनंद भाटे यासारखे त्यांचे शिष्य आज नावारूपास आहेत.
पंडित भीमसेन जोशी यांनी त्यांचे गुरू रामभाऊ कुंदगोळकर तथा सवाईगंधर्व यांच्या सन्मानार्थ सवाईगंधर्व महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. देशातच नव्हे,तर परदेशातही या महोत्सवाची कीर्ती पसरल्याने पंडितजी व शास्त्रीय संगीताचे चाहते या महोत्सवास आवर्जून हजेरी लावतात. पंडित स्वतः गायक असले तरी महोत्सवात गाणाऱ्या उदयोन्मुख तरुण गायकांनाही ते तेवढ्याच रसिकतेने ऐकत असत. सर्वच कलाकारांच्या सादरीकरणाचा आस्वाद घेत. ग्रीन रूम मध्ये जाऊन त्यांच्या चहा पाण्याची चौकशी करणे हे सर्व फार आत्मीयतेने ते करत असत. रात्रभर चालणाऱ्या या महोत्सवात तीन रात्री सतत जागून त्याचा आस्वाद घ्यायचा, नंतर आलेले कलाकार सकाळी त्यांना भेटण्यासाठी घरी जात. तीन दिवस रात्र जागून काढले की चौथ्या दिवशी त्यांचे गायन असे. पंडितजींचे गायन म्हणजे बहारदारच होणार असा अलिखित नियम होता. त्यांचे गायन ऐकण्यासाठी पहाटे महोत्सवाला रसिक येत असत. त्यावेळी त्या येणाऱ्यांना तिकीटही विचारले जात नसे.
महाराष्ट्रातील कोट्यवधींना आपल्या बुलंद स्वराने मोहणारे पंडित भीमसेन जोशी यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन..