नवी दिल्ली : कर्तव्यदक्ष माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांना पुडुचेरीचे उपराज्यपाल पदावरून काढून टाकण्यात आले आहे. मंगळवारी राष्ट्रपती भवनातून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
तेलंगाणाचे राज्यपाल डॉ. टी. सौंदराराजन यांना पुडुचेरीचे उपराज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. नवीन नियुक्ती होईपर्यंतही ते पदभार सांभाळतील. यासंदर्भात राष्ट्रपतींचा आदेश लगेच लागू होईल. प्रशासकीय विषयांबाबत पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी आणि किरण बेदी यांच्यात बराच काळ वाद सुरू होता. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. आणि उपराज्यपाल किरण बेदी यांना परत बोलाविण्यासंबंधी निवेदन सादर केले.
दरम्यान, किरण बेदी यांना हटवल्यानंतर मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी म्हणाले की, आमच्या दबावामुळे केंद्र सरकारने डॉ. किरण बेदी यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पुडुचेरीच्या लोकांचा हा मोठा विजय आहे. कल्याणकारी योजनांना रोखण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे येथे विकासाला अडथळा आला म्हणून आम्ही त्यांना विरोध केला. उपराज्यपाल किरण बेदी यांना हटवण्यासाठी मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी मोर्चेबांधणी केली होती, तर किरण बेदी यांना उपराज्यपालपद परत मिळावे, या मागणीसाठी नागरिकांकडून राज्यात धरणे आयोजित करण्यात आली होती.