वॉशिंग्टन – उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांचे पुतणे किम हान सियोल हा गायब झाला आहे. त्यामुळे त्याचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे. किम हान सियोल हे हुकूमशहा किम यांचे सावत्र भाऊ किम जोंग नामची यांचा मुलगा आहे. सियोल याच्या गायब होण्यामागे संशय किम यांच्यासह अमेरिकन गुप्तहेर संघटना सीआयएवर आहे.
सियोल हा अस्खलित इंग्रजी बोलतो आणि त्याचे वय २५ वर्षे एवढे आहे. त्याआधी त्याचे वडील किम जोंग नामची यांची २०१७ मध्ये एका एजंट मार्फत क्वालालंपूर विमानतळावर हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या हत्येच्या आरोपाखाली व्हिएतनामची महिला डॉन थिऊ ह्यॉंग आणि इंडोनेशियन महिला सीती असिया यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी या नामची यांच्या हत्येसाठी उत्तर कोरियाच्या तत्कालीन हुकूमशहाला जबाबदार धरण्यात आले होते. तथापि, प्योंगयांग यांनी नेहमीच हे अहवाल आणि आरोप फेटाळले आहेत. पण आता किमचा पुतण्या गायब झाल्यानंतर उत्तर कोरियात अनेक प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, किम हान सियोल, त्याची बहीण आणि त्याची आई अत्यंत गुप्त रितीने २०१७ मध्ये उत्तर कोरिया सोडून गेले. त्यानंतर काही जणांनी त्याला अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएच्या एजंटबरोबर अखेरचे पाहिले होते. तेव्हापासून त्याबद्दल काहीही माहिती नाही. त्याच्याबद्दल असे सांगण्यात येते की, चैनीचे आयुष्य जगण्याची त्याला खूप आवड आहे. वडिलांच्या निधनानंतर तो सर्व चर्चेपासून पूर्णपणे वेगळा जीवन जगत होता.