मनाली देवरे, नाशिक
……
किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सचा एका महत्वाच्या सामन्यात ८ गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेच्या सुरूवातीला मागे पडलेल्या या संघाने हिम्मत दाखवून विजेतेपदासाठी एक मजबुत दावेदारी पेश केली. केकेआरने १४९ धावा केल्या होत्या. पंजाबने १८.५ षटकातच हे आव्हान परतवून लावले. गेलच्या तडाखेबंद ५१ धावा आणि मनदीप सिंगच्या ६६ धावा या दोघांच्या परिश्रमातूनच हा अवघा विजय साकार झाला. केवळ एक खेळाडू संघात आल्यानंतर संघाचे नशिब पलटवू शकतो हे ख्रिस गेलने सिध्द करून दाखविले आहे. या विजयानंतर ४ थ्या महत्वपुर्ण स्थानावर आलेल्या पंजाबला आता जर विजेतेपदाची स्वप्न पडत असतील तर त्या गैर काहीच नाही, कारण तो दर्जा या संघाने सिध्द केला आहे. हे स्वप्न सत्यात उतरविण्याची ताकद या संघाकडे आहे हे आजच्या सामन्याने पुन्हा एकदा सिध्द केले.
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला सामन्याच्या शेवटच्या काही मिनीटात सामन्यावर पकड मिळवायची सवय लागली आहे. खास करून युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल संघात आल्यापासून तर या संघासमोर मोठे टारगेट ठेवल्याशिवाय विरूध्द संघाला जिंकण्याची संधीच मिळेनाशी झाली आहे. सलग ४ विजय मिळवून आलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब विरूध्द केकेआरला फार मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. १४९ ही धावसंख्या सन्मानजनक असली तरी किंग्ज इलेव्हन समोर माञ पुरेशी नव्हती. शुभमन गिलने सलामीला ५७ धावांची सुरेख खेळी केल्यानंतर आणि मधल्या फळीत कर्णधार इयान मॉर्गनने ४० धावांची संयमी खेळी केल्यानंतर १७५ च्या आसपास केकेआरची धावसंख्या पोहोचणार असे अपेक्षीत होते. परंतु, मोहम्मद शामीचे ३ महत्वपुर्ण बळी आणि त्यानंतर क्रिस जॉर्डन आणि रवी बिश्नोईचे प्रत्येकी २ बळी यांनी केकेआरच्या धावसंख्येला लगाम लावला.
मंगळवारची लढत
मंगळवारी दिल्ली कॅपीटल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात सामना होणार आहे. दिल्ली कॅपीटल्ससाठी हा सामना एक धोक्याची घंटा ठरू शकतो. मागच्या सलग दोन सामन्यात दिल्लीचा पराभव झालेला आहे आणि या सिझनमधल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्सने देखील दिल्लीचा पराभव करून दाखवला आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गुणांच्या टेबलमध्ये दिल्लीचा संघ २ नंबरवर आहे आणि सनरायझर्स ७ व्या नंबरवर, म्हणून सनरायझर्सला कमी लेखण्याची गफलत झाली तर आत्तापर्यन्त “सब ठीक है” असे म्हणत पुढे आलेल्या दिल्लीसाठी अडचणी तयार व्हायला वेळ लागणार नाही.