यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विशाखा काव्य पुरस्कार वितरणासाठी कवी अरुण कोलटकर नाशिकला आले होते. भाषण न करता फक्त कवितावाचन करणे हे कोलटकराचं वैशिष्ट्य होते. काय डेंजर वारा सुटलाय ही कविता त्यांनी वाचायला सुरुवात केली आणि रसिकांना कवितेतील वार्याचा जोरदार झोत सभागृहात शिरल्याचा भास झाला. त्यानंतर ज्ञानेश्वर समाधी दर्शन, बळवंतबुवा तक्ता आदी कवितांच्या सादरीकरणाने सारा माहौल त्यांनी बदलून टाकला. यालाच म्हणतात अस्सल कविता आणि कवितेचे दमदार सादरीकरण. काव्यवाचनाची एक वेगळी अनुभूती जमलेल्या सगळ्यांना आली.
कवितेतला आशय नेमकेपणानें आणि आशयासकट पोहोचवणे हे कवीचं बलस्थान आहे. त्यात काही कवी यशस्वी होतात. काव्यवाचन हा तसा अभिव्यक्तीचाच प्रकार आहे. रसिकांना आपल्या पारंपरिक लयीशी, जगण्याशी नाते सांगणारी कविता किंवा गाणे ऐकावेसे वाटते, यामध्ये त्यांच्या अभिरूचीचा भाग येतो.
कविता हा मानवी आयुष्याचा कणा आहे. आपल्या मनातील विविध भावना, स्पंदने, विचार यांचे अस्तित्व जिवंत ठेवणारा, आपले जगणे प्रभावी करणारा, मानवी नातेसंबंधांच्या तारा उजळ करणारा तो रक्ताइतकाच अविभाज्य घटक आहे. संतसाहित्य, लोकसाहित्य ओव्या, मौखिक परंपरेतून तो आला आहे. प्रामुख्याने तोच धागा काव्यवाचनात दिसून येतो.
त्यामुळेच कवितेचे अनेक आविष्कार समोर येत असतात. ‘नक्षत्रांचे देणे’ सारख्या कार्यक्रमांतून कवी, कविता, गाणे याचे नेमके सूत्र गुंफून एक अद्भुत स्वरानुभव रसिकांनी अनुभवला आहे आणि त्याला दिलखुलास दादही दिली आहे. कवितेचे गाणे होतानाची काळजात रुजण्याची ही हाक होती.
महाराष्ट्रातल्या सकस काव्यपरंपरेत गावोगावी कविता नेण्याचे काम खर्या अर्थाने विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर, वसंत बापट यांनी केले. कवितेतील रसाळ लय, गोडवा, जगण्याची गोडी म्हणजे नेमके काय, या विषयीच्या सहज सोप्या कविता त्यांनी सादर केल्या आणि कविता ही ऐकण्याची आणि अनुभवण्याची गोष्ट आहे, याची प्रचितीही दिली. रसिकांमध्ये कवितेचा झरा जिवंत ठेवण्याचे काम या कवींनी केले आहे. त्याचबरोबर नारायण सुर्वे, शंकर वैद्य, रामदास फुटाणे, फ.मु. शिंदे आदी कवींनी कवितावाचनातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
कवी ना.धों. महानोरांचा अस्सल मातीतला शेतीबांधाशी नाते सांगणारा आवाज लागला की, आपणही हरखून जातो आणि गगनाला नवे पंख फुटल्याचा भास होतो. लयदार, लखलखीत शब्दकळेने रसिक भारावून जातो. सुरेश भटाचे गज़लगायन, कवितावाचन तसेच पु.ल. देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांनी सादर केलेल्या आरती प्रभू, कुसुमाग्रज, बा.भ. बोरकर, बा.सी. मर्ढेकर यांच्या कवितांनी रसिकांमध्ये कविता हे जगण्याला पूरक स्पंदन आहे, याची जाणीव करून दिली आणि त्याला महाराष्ट्राने आपलेसे केले. हे महाराष्ट्राचे संचित म्हणावे लागेल.
अशोक नायगांवकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, किशोर कदम उर्फ कवी सौमित्र, निरंजन उजगरे, नलेश पाटील, प्रकाश होळकर या कवींनी ‘कवितांच्या गावा जावे’ कार्यक्रमातून कविता सादरीकरणाच्या अनोख्या वैशिष्टपूर्ण शैलीने आणि आशयप्रधान कवितांनी रसिकांना कवितेच्या जवळ नेण्याचे काम केले. सौंदर्यकविता, प्रेमकविता, महानगरीय कविता, निसर्गकविता अशा विविध प्रकारच्या मराठी कवितेचा प्रवास त्यांनी या कार्यक्रमातून सादर केला.
खेड्यापाड्यांतील चांगली कविता लिहिणार्या कवींची मोट बांधून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम कवी रामदास फुटाणे यांनी केले आहे. त्यात अनेक ग्रामीण भागातील कवी साहित्याच्या केंद्रभागी आले आहेत, हे कवितेच्या कक्षा रुंदावणारे आहे. चांद्यापासून ते अमेरिकेपर्यंत यांच्या ग्लोबल कवितावाचनाने मराठी कवितेचा आवाज जगभर पोहोचला आहे. लासलगांवसारख्या ठिकाणी कविता ऐकण्यासाठी दहा हजाराहून श्रोते येतात. हास्य-धारांचा अनुभव घेतात. ही सुखावणारी घटना आहे.
कविता नावाची कला जगण्याशी थेट नाते जोडत असते आणि सामाजिक, सांस्कृतिक बदल कवेत घेत असते. म्हणूनच कविता-सादरीकरण हा जगण्याचा उत्सव असतो आणि माणसांची मने जोडणारी चळवळही…!
सुन्दर लिखाण
छान विवेचन.
कोलटकर ह्यांच्या काय डेंजर वारा सुटलाय ह्या कवितेचे शीर्षक जयंत पवार ह्यांनी आपल्या नाटकासाठी वापरले होते! काव्यवाचन हा प्रकार पूर्वी बापट पाडगावकर आणि विंदा नि रुजवला! तुम्ही म्हटले आहे त्या प्रमाणे इतर कवींनी सुद्धा तो नेटाने पुढे चालू ठेवला! तो प्रवाह असाच पुढे चालू रहावा!
राजाभाऊ फारच छान काव्य चळवळी बद्दल आपण लिहिलं .