पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) – साकोरा (मिग) फाटा येथे कारला लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून हा प्रकार कसा घडला याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील साकोरा (मिग) येथील सरपंच विमल शिंदे यांचे पती संजय चंद्रभान शिंदे (वय ५४) हे सियाझ कार (क्र. एमएच १५ एफएन ४१७७) मधून पिंपळगाव बसवंतच्या दिशेने जात होते. सकाळी ११ च्या सुमारास साकोरा फाटा येथे कारने अचानक पेट घेतला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे शिंदे हे प्रचंड घाबरले. त्याक्षणी काय करावे हे त्यांना सूचत नव्हते. कारचे सर्व दरवाजे आणि काचा लाॅक झाल्यामुळे गाडीबाहेर पडणे शिंदे यांना शक्य झाले नाही. काही क्षणातच कार आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. प्रत्यक्षदर्शींनी गाडीच्या काच फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचे लोट मोठे होते आणि त्यातच होरपळून शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव बसवंत अग्निशामक दलाचे प्रमुख सुनील मोरे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पथकाने आग नियंत्रणात आणली. तर, पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सुरेश चौधरी, महामार्गच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा कदम यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेत मदतकार्य केले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मदतकार्यास अडथळा येत होता. मात्र, पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवले. यावेळी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी राहुल मोरे, शांताराम निंबेकर, तुषार झाल्टे, रामदास गांगुर्डे यांनी बंदोबस्त ठेवला. शिंदे यांच्या पश्चात आई, दोन, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.