नाशिक – महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने मध्य रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या विविध भागात कार पाठविण्यास प्रारंभ केला आहे. याद्वारे इंधनाची बचत होत आहे. तसेच, याद्वारे कार्बन फूटप्रिंटही मिळविता येत आहे.
भारतीय रेल्वेने २०३० पर्यंत ‘शून्य’ कार्बन उत्सर्जनाचे मोठ्या प्रमाणातील परिवहन नेटवर्क साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून मध्य रेल्वेने महिंद्रा कंपनीशी समन्वय केला. त्यामुळेच महिंद्रा कंपनी त्यांच्या कार मालगाडीद्वारे देशाच्या विविध भागात पाठविण्यास तयार झाली आहे. यामुळे वेळ, इंधन आणि पैसा याची मोठी बचत होत आहे. टाटा मोटर्स व इतर वाहन कंपन्यांसमवेत मध्य रेल्वेने बैठका घेतल्या आहेत. मारुती कंपनीनेही या आर्थिक वर्षात फ्रेट ट्रेनचा वापर करून देशभरातून १.७८ लाख मोटारींची वाहतूक ५ लोडिंग टर्मिनल्सवरून नागपूर व मुंबईसह १३ टर्मिनलवर केली आहे.
असे आहेत अत्याधुनिक रॅक
कारची विशिष्ठ रॅकमधून वाहने पाठविली जातात. एका रेकमध्ये ११८ वाहने जाऊ शकतात. नवीन उच्च क्षमता असलेली बीसीएसीबीएम रेल्वे वाघिणीची रेक अंदाजे ३०० वाहने वाहून नेऊ शकतात. सध्या, रेल्वे ऑटोमोबाईल वाहतुकीसाठी न्यू मॉडिफाइड गुड्स (एनएमजी) रॅक आणि खाजगी मालकीचे बीसीएसीबीएम रॅकचा वापर करते. वाहतुकीची वेळ कमी करण्यासाठी या रॅक्सच्या वाहतुकीवर बारीक नजर ठेवली जात आहे. त्यानंतर पुढील लोडिंगसाठी हे रॅक्स उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांचे समाधान होत आहे. महाराष्ट्र हे एक मोठे ऑटोमोबाईल वाहन केंद्र आहे, जिथे महिंद्र, टाटा, फोर्ड, पियाजिओ, बजाज इत्यादी कंपन्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद भागात वाहने तयार करतात. महाराष्ट्रात उत्पादित वाहने (ऑटोमोबाईल) देशाच्या विविध भागात नेण्याची बरीच क्षमता आहे. जुलै महिन्यात मध्य रेल्वेने १८ रेकद्वारे मोटारींची वाहतूक केली आहे.
यांचीही वाहतूक
मध्य रेल्वेने दौंडहून प्रथमच मोलॅसेस अल्कोहोल कचर्यापासून निर्मित अॅग्रो बेस्ड खताची (पोटाश) वाहतूक केली आहे. नागपूर विभागातील बैतूल व मुलताई स्थानकांवरून नव्याने गव्हाची वाहतूक, खंडवा व पारस येथून मका, भुसावळ विभागातील चाळीसगाव येथून भुसा वाहतूक सुरू झाली आहे.