नाशिक – कारची काच फोडून १५ लाख रूपयांची रोकड लंपास केल्याच्या प्रकरणाचा मुंबई नाका पोलिसांनी भांडाफोड केला आहे. मालकाला धडा शिकवण्यासाठी नोकरानेच हा चोरीचा प्लॅन रचल्याचे समोर आले आहे. दरम्यान लुटीची ही रक्कम रोकड रौलेट जुगाराशी संबधीत असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणात पोलिसांनी मयुर राजेंद्र भालेराव (रा. तिवंधा, भद्रकाली) आणि रामा सुंदर शिंदे (रा. पंचवटी) या दोघांना रात्री उशिरा अटक केली. विशेष म्हणजे या प्रकरणात फिर्यादी भालेराव हाच आरोपी असल्याचे उघड झाले आहे.
शुक्रवारी दुपारी मुंबईनाका परिसरातील छान हॉटेलजवळ लुट केल्याचा बनाव करण्यात आला होता. यात १५ लाख रूपये पल्सरवरील आरोपींनी कारची काच फोडून लुटून नेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलिस निरीक्षक के. टी. रोंदळे, साजिद मन्सुरी व गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. या तपासात सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पण, त्यात काहीच आढळून आले नाही. त्यानंतर पोलिसांचा संशयाची सुई भालेगावकडे वळाली. त्यांनी भालेरावची कसून चौकशी केल्यांतर त्याच्याविरोधात पूर्वी एक गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी आपला खाक्या दाखवला. त्यानंतर भालेराव याने मी तीन साथिदारासह लुटीचा बनाव रचल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी भालेरावसह रामा शिंदे यांना गजाआड केले. या घटनेशी संबधीत दोन आरोपी अद्याप फरार आहे. पोलिस त्यांचाही शोध घेत आहे.