मुंबई – देशात दररोज कुठल्या ना कुठल्या उत्पादनांची भाववाढ होत आहे. अशात मध्यमवर्गियांना रोख भरून कार खरेदी करणे अत्यंत अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे बहुतांश लोकांची पसंती कर्जावर वाहन खरेदी करण्यालाच असते. भलेही कर्जाच्या हफ्त्यांनी माणूस त्रस्त असतो, पण तो कर्जाचाच मार्ग निवडतो. या सोबत दर वर्षी कारचा विमा उतरविणेही अनिवार्य असते. विम्यापोटीही दर वर्षी ३० ते ४० हजार किंवा त्याहीपेक्षा जास्त रक्कम भरावी लागते. तर काही लोक विम्याच्या नावावर फसवणुकही करतात. त्यामुळे कारचा विमा काढण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे आवश्यक आहे.
तुलना करा – मार्केटमध्ये विमा काढून देणाऱ्या अनेक कंपन्या आज उतरल्या आहेत. मात्र एका स्मार्ट ग्राहकाप्रमाणे आपण सर्व कंपन्यांच्या दरांची तुलना करणे आवश्यक आहे. सर्व कंपन्यांना त्यांच्या विम्याचे कोटेशन्स मागा. बरेचदा डिलर तुम्हाला महागड्या विम्याची माहिती देतात. बरेचदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आमिषे या कंपन्या देत असतात. आमच्याकडून विमा काढाल तर क्लेमसाठी धावपळ करण्याची गरज पडणार नाही, असेही या कंपन्या सांगतात.
विमा कसे काम करतो – वाहनांचा विमा वापरा किंवा गमवा या तत्वावर काम करीत असतो. एखाद्या गंभीर अपघातात भरपाई मिळविण्यासाठी कित्येक वर्षे तुम्हाला प्रिमीयम भरावे लागते. पण अपघात झाला नाही तर प्रिमीयमचे सर्व पैसे वाया जातात. मात्र अशा परिस्थितीत तुम्हाला एक नो क्लेम बोनस मिळतो आणि ती रक्कमही मोठी असते. पहिल्या वर्षीच्या प्रिमीयमच्या २० टक्क्यांपासून सुरू होऊन सहाव्या वर्षी ५० टक्क्यांपर्यांतची क्लेम रक्कम मिळत असते.
मॉडिफाय करताना – बरेचदा कार खरेदी केल्यानंतर शोरूममधून बाहेर पडल्यावर एखाद्या वर्कशॉपमध्ये कार मॉडीफाय करण्याचे फॅड आहे. विशेषतः तरुणांमध्ये हे जास्त प्रमाणात बघितले जाते. सायलेंसर किट, एलईडी डीआरएल, अनआथराईज्ड सीएनजी किट आदी गोष्टी बाहेरून लावून घेतल्या जातात. पण त्यामुळे वॉरंटी संपून जाते. एवढेच नाही तर विमा कंपन्याही प्रिमीयम वाढवतात.