इंदूर – मध्यप्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील नागदा जंक्शन येथे अत्यंत अमानुष घटना घडली आहे. एका महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या सासरच्यांनी तिच्यावर तलवारीने हल्ला केला. एवढेच नाही, तर तिला एका खोलीत कोंडून ठेवत तिचे नाक, स्तन आणि जीभ कापली. माणुसकीला काळिमा फासणारे हे दुष्कर्म करणाऱ्यांपैकी सासरा आणि मावस सासू या दोघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे.
या दुर्दैवी महिलेचे नाव राधाबाई असे आहे. इंदूरमधीलच महाराजा यशवंतराव रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी राधाबाईला तिचा नवरा राजेश चंद्रवंशी, सासरा सीताराम, सासू गेंदाबाई आणि मावस सासू कलाबाई या सर्वांनी एका खोलीत कोंडले. आणि तिच्यावर तलवारीने हल्ला केला. ती ओरडू नये म्हणून तिचे तोंड देखील बंद केले. त्यानंतर जखमी अवस्थेत तिला घराबाहेर फेकून दिले. या महिलेची अवस्था गंभीर आहे. याप्रकरणी, पोलिसांनी या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र यातील सासरा आणि मावस सासू वगळता इतर सर्व आरोपी फरार आहेत.
राधाबाई आणि राजेश यांचा विवाह १५ वर्षांपूर्वी झाला. त्यांना दोन मुले आहेत. ट्रक ड्रायव्हर असल्याने राजेश बहुतेकवेळा घराबाहेर असतो. त्यामुळे तो नेहमीच राधाबाईच्या चारित्र्यावर संशय घेत असे. या प्रसंगांच्या आधीही राधाबाई हिने नवऱ्याविरोधात मारहाणीची तक्रार केली आहे.