नवी दिल्ली – माणूस मरेपर्यंत विद्यार्थीच राहतो, असं म्हणतात. ओडिशातील जयकिशोर प्रधान या आजोबांनी हे सिद्ध केले आहे. त्यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी बँकेच्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर वीर सुरेंद्र साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च येथे एमबीबीएसला प्रवेश घेतला आहे.
ओडिशातील बरगाढ जिल्ह्यातील अटाबीरा येथील भालुपाली येथे राहतात. ते स्टेट बँक ऑफ इंडियात कार्यरत होते. लहानपणासूनच डॉक्टर होण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते आता पूर्ण होत असल्याने ते खूप खुष आहेत. बारावीनंतर त्यांनी मेडिकल एन्ट्रन्स दिली होती, पण ते त्यात यशस्वी ठरले नाहीत. त्यामुळे शेवटी त्यांनी फिजिक्समध्ये पदवी घेतली. काही काळ शाळेत शिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. नंतर बँकेत काम करण्यास सुरुवात केली.
इतकी वर्षे निष्ठेने नोकरी करून निवृत्ती घेतल्यानंतर लहानपणीच्या स्वप्नाने पुन्हा एकदा उचल घेतली. त्यामुळे त्यांनी पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. आणि यावर्षी नीट परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांना संधी मिळाली. दरम्यान, १० वर्षांपूर्वी त्यांचा अपघात झाला. त्यात ते अपंग झाले. यामुळे त्यांना दिव्यांग कोट्यातून ही सीट मिळाली आहे.
आपले हे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये पत्नी प्रतिभा हिचे खूप मोठे योगदान असल्याचे ते सांगतात. त्यांना २ मुले आहेत. मुलगी डेंटिस्टचे शिक्षण घेत आहे. तर मुलगा दहावीला आहे.