अशोकनगर (मध्य प्रदेश) – केंद्र सरकारकडून डिजिटल इंडियाच्या कितीही घोषणा दिल्या तरी वस्तुस्थिती विपरित दिसून येत आहे. सरकारकडून अनेक योजनांचा प्रचार कोट्यवधी रुपये खर्चून केला जातो. मात्र अनेक सुविधा सामान्य लोकांना मिळत नाहीत. याचा फटका राजकीय नेत्यांनाही बसतो. मध्य प्रदेशातल्या एका मंत्र्यांनाच याचा फटका बसत आहे.
ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याचं जळजळीत वास्तव आहे. नेटवर्क मिळवण्यासाठी लोक मोठ्या झाडांवर चढतात. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री बृजेश सिंह यादव यांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यांना फोनवर बोलण्यासाठी ५० फूट आकाश पाळण्यात बसावं लागतं. आकाश पाळण्यात बसल्यावर त्यांना नेटवर्क मिळतं. त्यामुळे दिवसातले तीन तास यादव हे आकाश पाळण्यात जाऊन बसतात.
बृजेश सिंह यादव हे मुंगावलीच्या सुरेल गावातले आहेत. त्यांनी गावात भागवत कथेचं आयोजन केलं आहे. त्यामुळे ते गेले ९ दिवस गावातच आहेत. मंत्रीच गावात आल्यामुळे ग्रामस्थ त्यांच्या तक्रारी घेऊन त्यांच्याकडे जातात. त्या सोडवण्यासाठी त्यांना फोन करावा लागतो. पण त्यासाठी मोबाईल नेटवर्क मिळत नाही. अधिकार्यांना सूचना देण्यासाठी फोन केला तर नेटवर्क गायब असते. डोंगराळ प्रदेशाच्या आसपास गाव असल्यानं नेटवर्क मिळणं अवघड ठरतं. त्यामुळे मंत्र्यांना आकाश पाळण्यात जावून बसावं लागतं.