मुंबई – उन्हाळा सुरु झाल्यानंतर आपल्या सर्वांनाच फळांच्या राजाची अर्थात हापूस आंब्याची आठवण होते. आंबा हे फळ अबाल वृद्धांना आवडते, त्यात हापूस आंबा असेल तर काही विचारायलाच नको. हापूस आंब्याचे पहिले फळ बाजारात येण्यापासून ते अगदी या फळाची विक्री, दरांमध्ये होणारे चढउतार या साऱ्यावरच अनेकजण लक्ष ठेवून असतात. कारण, हा आवडता रसाळ फळांचा राजा आपल्या घरी कधी येतो, याचीच उत्सुकताही सर्वांना लागलेली असते. यंदा हापूस आंब्याने दरांचा एक मोठा विक्रम केला आहे. कोकणच्या हापूसला यंदा विक्रमी भाव मिळाला असून ५ डझनच्या पेटीची १ लाख ८ हजार रुपयांना विक्री झाली आहे.
राजापूरमधील बाबू अवसरे या शेतकऱ्याच्या ५ डझन हापूस आंब्याच्या पेटीला हा विक्रमी दर मिळाला आहे. कोकणातील हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘मायको’ या देशातील पहिल्याच मँगोटेक प्लॅटफॉर्मद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे.
कोकणातील १० आंबा बागायतदारांच्या मुहूर्ताच्या आंबा पेटींचा लिलावाचा कार्यक्रम मुंबईमधील अंधेरीतील मॅरिएट येथे आयोजित करण्यात आला होता. ‘मायको’ ब्रँडची पहिली पेटी उद्योजक आणि सेंट अग्नेलो व्हीएनसीटी व्हेंचरच्या राजेश अथायडे यांनी १ लाख ८ हजार रुपये अशी विक्रमी किंमत देऊन घेतली.
गेल्या १०० वर्षांमध्ये हापूस आंब्याच्या पेटीला इतका दर मिळाला नव्हता. हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम आहे. त्यामुळे आता येत्या काळात आंब्याच्या दरांकडे विक्रेते आणि खरेदीदारांचं विशेष लक्ष असणार आहे.