नोएडा – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवनवीन टेक्नॉलॉजीच्या आधारे डिजिटल व्यवहार विकसित करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे आतापर्यंत डिजिटल व्यवहार केवळ इंटरनेटशी कनेक्ट केलेल्या स्मार्टफोनद्वारे शक्य होते. मात्र यापुढे देशातील कोणत्याही प्रकारच्या मोबाइल वापरकर्त्यास डिजिटल व्यवहार करता येणे शक्य होणार आहे. म्हणजेच साध्या मोबाईलवरूही पैसे पाठवता येतील.
इरोट टेक्नॉलॉजीजने सिम टूल किट (एसटीके) वर आधारीत एक प्रणाली विकसित केली आहे. याद्वारे साध्या फोनवरुनही डिजीटल व्यवहार करता येतील. या प्रणालीची चाचणी यशस्वी झाल्यास हे शक्य होणार आहे. या प्रणालीमुळे युपीआय, मनी ट्रान्सफर, आर्थिक व्यवहार आणि बिल पेमेंट करण्यास मदत होईल. विशेष उल्लेखनीय बाब अशी आहे की, आपल्या देशातील फीचर फोन वापरणाऱ्यांची संख्याही कोटींमध्ये आहे.
इरोट टेक्नोलॉजीज ही डिजिटल पेमेंट कार्ड कंपनी असून ती बँकिंग आणि पेमेंट सेक्टरमधील तज्ज्ञांनी स्थापन केली आहे. लोकांना सोपी सुरक्षित आणि विश्वासार्ह आर्थिक व्यवहार सेवा उपलब्ध करून देण्याचे या कंपनीचे उद्दीष्ट आहे. नियामक सँडबॉक्स ही एक संरक्षित प्रणाली असून त्या अंतर्गत निवडक कंपन्या त्यांच्या उत्पादनांची चाचणी घेतात आणि त्यांचे संचालन करतात. या प्रणालीअंतर्गत कंपन्यांना डमी डेटाचा व्यवहार करून आपली तयारी दर्शविली पाहिजे. संरक्षित प्रणाली अंतर्गत यश मिळविल्यानंतर, वास्तविक बँका आणि ग्राहकांच्या डेटासह थेट वातावरणात सिस्टमची चाचणी घेण्यास परवानगी दिली जाईल. याकरिता नोव्हेंबर २०१९ मध्ये पहिल्या टप्प्यासाठी आरबीआयकडून अर्ज मागविण्यात आले होते.