इंदूर – लग्नात कचराच निघाला नाही, असे कुणी सांगितले तर आपला विश्वास बसेल का? पण, देशातील पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर असलेल्या इंदूरमध्ये हे घडले आहे. नागरिकांनाही स्वच्छतेची सवय लागल्यानेच हे शक्य झाले आहे. त्यामुळेच आपण आज या अनोख्या लग्नाविषयी माहिती घेणार आहोत.
दोन दिवसांचा सोहळा
लग्नाची पत्रिका कचऱ्यात जाते म्हणून या पत्रिकेला फाटा देत ई-कार्ड वाटप केले गेले. तसेच संपूर्ण विवाह सोहळ्यात अशी कोणतीही गोष्ट वापरली गेली नव्हती, ज्यामुळे कायम स्वरूपी कचरा निर्माण होईल. दोन दिवसांच्या सोहळ्यात तात्पुरता केवळ ४० किलो ओला कचरा गोळा झाला. लग्नाच्या ठिकाणीच तोही निकाली काढला गेला. या कचऱ्याचे थेट खत बनविले गेले.
अशी मिळाली प्रेरणा
हा अनोखा विवाह नुकताच एका बागेत झाला. इंदूर आयआयटीमधील मेकॅनिकल अभियंता रोहित अग्रवाल आणि इंटेरिअर डिझायनर पूजा गुप्ता यांनी झिरो वेस्ट थीमवर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. रोहित याला एकदा ‘लग्नात कचरा टाकू नका’ या विषयावर एका संस्थेतर्फे भाषण देण्यास सांगण्यात आले. तेव्हापासून त्यांनी ठरविले होते की, आपल्या लग्नात आम्ही कचरा करणार नाही. यावर्षी जेव्हा त्याचे पूजाशी लग्न ठरले तेव्हा त्याने आपली नववधू पत्नी पूजाला झीरो वेस्ट या थीमवर लग्न करण्याची संकल्पना सांगितली आणि तीने ती मान्य केली.
कचऱ्यापासून खत
लग्नात डिस्पोजेबल सामग्री वापरली जात नव्हती, तसेच सजावटीने अशी सामग्री ठेवली नाही, ज्यामुळे कचरा होऊ शकतो. स्टिलच्या प्लेट्स भोजनासाठी वापरल्या गेल्या. पाहुण्यांना देखील कचरा करू नका, असे आवाहन करण्यात आले. स्वयंपाक करताना भाजीपाला वगैरेचा वाया गेलेल्या भागातून तयार झालेला कचरा जागेवरच निकाली काढण्यात आला. लग्नस्थळीच एक व्हॅन आणण्यात आली. त्या व्हॅनमध्ये भाजीपाला आणि उष्टे अन्न पदार्थ यांच्यापासून गांडूळ खत तयार करण्यात आले.