नवी दिल्ली – हो, तुम्ही बरोबर वाचलंय. आतापर्यंत आपण नेहमी मोबाइलचे किंवा त्यामुळे होणारे दुष्परिणाम पाहिले आहेत. त्यामुळेच आम्ही आज तुम्हाला मोबाइलमधील ऍप बद्दल सांगणार आहोत. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मोबाइलमध्ये फिटनेसशी संबंधित अनेक ऍप्स असतात. अनेकांना त्याची माहिती असते, पण त्याचा वापर फार कमी लोक करतात.
स्टेप काउंटर फीचर
हे फीचर म्हणजे आपण दिवसभरात किती पावले चाललो याचे मोजमाप. आजकाल सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी या कंपन्यांच्या फोनमध्ये हे फीचर इनबिल्ट असते. या फिचरमध्ये तुम्ही दिवसभरात किती चालायचे आहे, याचे टार्गेट किंवा लिमिट सेट करू शकता. यामुळे तुम्हाला फिट राहण्यास मदत होईल.
डिजिटल वेलबिईंग
स्मार्टफोन आज काळाची गरज झाला आहे. हे कितीही खरं असलं तरी प्रत्यक्षात आपण कामाव्यतिरिक्त बराच वेळ त्यावर घालवतो. मोबाइलवर एवढा वेळ घालवणं म्हणजे एक जागी बसून राहणं, कोणतीही शारीरिक हालचाल न करणं. यामुळे आरोग्य निश्चितच धोक्यात येतं. त्यामुळे मोबाइल वापरावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. यासाठी हे फिचर तुम्हाला मदत करेल. आपण एखाद्या ऍपमध्ये किती वेळ घालवतो, हे आपल्याला या ऍपमुळे कळते. तसेच कोणते ऍप किती वेळ बघायचे यासाठी तुम्ही टाइम सेट करू शकता. तसेच यात एक फोकस मोडही असतो. तो ऍक्टिव्हेट केल्यावर आपल्याला नोटिफिकेशन येणं बंद होतं. आणि आपलं लक्ष विचलित होत नाही.
गाईडेड ब्रीदिंग फीचर
श्वास घेण्याची देखील एक योग्य पद्धत असते. ती कशी, ते या फिचरमधून कळते. योग्य पद्धतीने श्वास घेतल्याचा आरोग्यावर योग्य परिणाम होतो. तसेच रक्तदाबाचे प्रमाणही कमी राहते. जर तुमच्याकडे ओप्पोचा फोन असेल तर त्यात हे फिचर सापडेल.
बेडटाईम मोड
अलीकडे झोपण्यापूर्वी मोबाइल बघितला जातो. तसा दिवसभरात पाहिला गेला तरी तो कामानिमित्त असतो. त्यामुळे रात्री झोपताना टाईमपास म्हणून हमखास मोबाइल बघितला जातो. पण हे डोळ्यांसाठी त्रासदायक आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? यासाठी हे फिचर आहे. हे फीचर ऍक्टिव्हेट करून तुम्ही मोबाइलचा प्रकाश सौम्य करू शकता, ज्यायोगे डोळ्यांवर कमी उजेड पडेल. खरंतर रात्रीच्या शांत झोपेसाठी मोबाइल बघूच नये, पण बघायचाच असेल तर या फीचरचा नक्की वापर करा.
हे लक्षात ठेवा
शारीरिक स्वास्थ्यासाठी गरजेशिवाय मोबाइलचा अति वापर टाळणे हा सर्वोत्तम उपाय. पण ते जर टाळता येणे शक्य नसेल तर किमान या उपायांमुळे तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काही प्रमाणात काळजी घेऊ शकाल.