नाशिक – शहराचे पालकत्व सांभाळणाऱ्या महापालिकेच्या कारभाराबद्दल नाके मुरडणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महापालिकेने शहरातील खासगी हॉस्पिटलचे लेखापरिक्षण करुन रुग्णांचे तब्बल १ कोटी रुपये वाचविले आहेत. तशी माहिती महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक बी. जी. साेनकांबळे यांनी दिली आहे.
कोरोना उपचारासांठी खासगी हॉस्पिटल्सनी भरमसाट लूट सुरू केल्याचा आरोप झाल्यानंतर महापालिकेने लेखापरिक्षकांची पथके तैनात केली. या पथकांनी हॉस्पिटल्सला भेटी देऊन त्यांच्याकडील कागदपत्रे आणि बिलांची तपासणी केली. यामुळे रुग्णांकडून पैसे उकळण्याच्या प्रकारांना चाप बसल्याचे स्पष्ट होत आहे. महापालिकेने १६४ लेखापरक्षकांची नियुक्ती करुन लेखापरिक्षण सुरू केले आहे. गेल्या ३७ दिवसांत या लेखापरिक्षकांनी शहरातील ९९ खासगी हॉस्पिटलमधील ६ हजार बिलांची तपासणी केली आहे. त्याद्वारे १ काेटी ५ लाख रुपये कमी केले असल्याचे सोनकांबळे यांनी सांगितले आहे.