नाशिक – धुळ्याहून नाशिककडे निघालेल्या दुपारी १.४५ च्या विनावाहक बसच्या चालकाने कमालच केली. भयानक वेगात मध्ये अर्धा तास अनधिकृत हॉटेलला बस थांबवून, प्रवाशांचा जीव धोक्यात घालून ही बस ५ वाजताच्या सुमारास नाशिक वर्कशॉपजवळील, आईस फॅक्टरी जवळ थांबविली. भर वेगात चालणारी बस अचानक रिक्षा स्टॉप वर थांबवून चालकाने सर्व प्रवाशांना, गाडीचे ब्रेक फेल झाले असे कारण देऊन बसमधून खाली उतरण्यास सांगितले. सुरुवातीला मागाहून भरगच्च येणाऱ्या बसमध्ये चालकाने सर्व प्रवाशांना कोंबण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोरोना संकट काळात अशी गर्दी धोकेदायक असल्याने काही वृद्ध प्रवाशांनी त्या इतर फुल्ल बसमध्ये चढण्यास नकार दिला. नाशिक डेपो किंवा वर्कशॉपमधून नवीन बस मागवावी, असा प्रवाशांनी आग्रह धरला. त्यावर चालकाने तुम्ही चालत सीबीएस जा किंवा डेपो मॅनेजरला कॉल करा, असा सल्ला दिला. मात्र प्रवाशांनी आग्रह धरल्याने चालकाने कॉल करून उलट सुलट, खोटी माहिती देण्यास सुरुवात केली. त्याला काही प्रवाशांनी अटकाव करीत, योग्य माहिती देण्यास सांगितले. यावर संताप व्यक्त करत बस चालक हा बस (क्रमांक एमएच १४ – बीटी – ०७४२) व प्रवाशांना वाऱ्यावर सोडून, काहीही न सांगता निघून गेले. कंटाळून अनेक प्रवाशी रिक्षाने निघून गेले. शेवटी साडेपाचच्या सुमारास एक फिटर आला व मागाहून बस येत असल्याचे सांगितले. त्या बसमधून अखेर उरले सुरले, मोजके प्रवाशी नवीन सीबीएस स्थानकात पोहोचले. ही बस खरेच नादुरुस्त किंवा ब्रेक फेल असेल तर प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या भरधाव व बेफिकीर ड्रायव्हिंगची चौकशी व्हायला हवी; तसेच प्रवाशांना काहीही न सांगता त्यांना वाऱ्यावर सोडून जाणाऱ्या वाहकाच्या वर्तनाची तपासणी व्हावी, अशी मागणी बसमधील एका सजग महिला प्राध्यापिकेने केली.