मुंबई – पक्के हाडवैर असलेले आणि नेहमी एकमेकांवर तोंडसुख घेणाऱ्या दोन नेत्यांमध्ये संवाद झाल्याची बाब समोर आली आहे. पूर्वी शिवसेनेत असलेले आणि सध्याचे भाजप नेते नारायण राणे यांचे महिनाभरापूर्वी शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. खुद्द राणे यांनीच तशी माहिती दिली आहे. यापूर्वी त्यांनी या संवादाबाबत नकार दिला होता. पण, आता ते कबुल झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे येत आहेत. शहा यांच्या हस्ते या कॉलेजचे उदघाटन होणार आहे. या मेडिकल कॉलेजला आवश्यक परवानग्यांबाबत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महिन्याभरापूर्वी फोन केला होता. महिन्याभरापूर्वीच ही बाब शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितली होती. त्यावेळी राणे यांनी ते फेटाळून लावले होते. मेडिकल कॉलेजच्या परवानगीचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. राज्याच्या नाही, असे राणे यांनी सांगितले होते. मात्र, आता त्यांनी त्याची कबुली दिली आहे.
हा झाला संवाद
मेडिकल कॉलेज संदर्भातील सरकारी अध्यादेश काढण्यात यावा. महाराष्ट्राला कळू द्या की सिंधुदुर्ग मध्ये मी मेडिकल कॉलेज आणले आहे. त्यावर उद्धव यांनी होकार दिला. यापलिकडे काहीही बोलणं झालं नसल्याचं राणे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.