नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठ्या अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (एम्स) या वैद्यकीय संस्थेची परिस्थिती रूग्णांसाठी सध्या अत्यंत वाईट आहे. कारण लॉकडाऊननंतर काही महिन्यांनी येथे आरोग्य सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या. मात्र २०२५ पूर्वी येथे ऑपरेशनसाठी तारखा उपलब्ध होताना दिसत नाहीत. तसेच, येथे रुग्णांसाठी बेड देखील शिल्लक नाही.
एम्समधील डॉक्टरांनी सांगितले की, न्यूरो, हार्ट आणि कर्करोग विभागात सर्वाधिक रुग्णांची अॅपाईंटमेट असून एम्स व्यवस्थापन मात्र गप्प आहे. याबाबत संबंधीत वैद्यकिय अधिकाऱ्याने सांगितले की, रुग्णांची संख्या वाढली असून सर्वांना उपचार देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.
एका रुग्णाला डॉक्टरांनी हृदयविकाराचा ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. मात्र त्यासाठी पाच वर्ष थांबण्याचे सांगितले. सुरवातीला डॉक्टर काय बोलले त्या रूणाला समजले नाही, परंतु पुन्हा विचारले असता डॉक्टर म्हणाले की, एम्स मध्ये २०२५ पूर्वी ऑपरेशनसाठी तारखा नाहीत. जर तुम्हाला तातडीने उपचार घ्यायचे असतील तर तुम्ही खाजगी किंवा अन्य सरकारी रुग्णालयात जाऊ शकता. बलिया येथील रहिवासी रमेश सिंग हे ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी सहा महिन्यांत चौथ्यांदा आले, तेव्हा त्यांच्या बाबत हा प्रकार घडला.
सारिता विहार येथे सिद्धार्थ दुबे यांच्यासमवेत अशीच घटना घडली. त्याच्या वडिलांना ब्रेन ट्यूमर आहे आणि अनेक वेळा ओपीडीमध्ये दाखवल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना १ लाख २० हजार रुपये जमा करण्याचा सल्ला दिला, आणि त्यांच्या खासगी रुग्णालयात जाण्याचे सांगितले.
सध्या येथे अशी परिस्थिती आहे की, एम्सच्या रूग्णांना इतर सरकारी व खासगी रुग्णालयात पाठवले जात आहेत, स्वत: चा बचाव करण्यासाठी त्रस्त असलेले एम्सचे डॉक्टर सोशल मीडियावर सरकारला टॅग करून या समस्येवर तोडगा देखील शोधत आहेत.
दरम्यान, राज्यसभेत आरोग्य राज्यमंत्री अश्वनीकुमार चौबे यांनी सांगितले की, आता एम्समध्ये प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागत नाही, सध्या एका महिन्यापेक्षा जास्त काळ ऑपरेशनसाठी रूग्णांना थांबण्याची गरज नाही. रुग्णांची संख्या जास्त असूनही एम्समध्ये ८० टक्के अपॉईंट्सला प्रतीक्षा नसते.