नाशिक – गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेले दातार जेनेटिक्स आणि जिल्हाधिकारी यांच्यातील कलगीतुरा अखेर मिटला आहे. दोघांमध्ये समझोता होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दातार लॅबला पुन्हा परवानगी बहाल केली आहे.
कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दातार जेनेटिक्सला प्रयोगशाळा बंद करण्ाचे निर्देश दिले होते. तर, याप्रकरणी मोठी बदनामी झाल्याचे सांगत दातार लॅबने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिव यांना तब्बल ५०० कोटी रुपयांच्या मानहानीची नोटिस पाठवली होती. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजले. आता पुढे काय होणार, अशी उत्सुकताही सर्वांना लागली होती. अखेर या साऱ्या प्रकारावर आता पडदा पडला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आदेश असे
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकांमध्ये प्रयोगशाळेतील पॉझिटिव्हिटी रेट जास्त येत असल्याच्या चर्चेच्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक व आयुक्त नाशिक महानगरपालिका यांचेकडील प्राप्त अहवालानुसार सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या लॅब चे कामकाज आयसीएमआर च्या मार्गदर्शक तत्वां प्रमाणे सुरू आहे किंवा कसे हे तपासण्याच्या दृष्टीने दिनांक 27/2/2021 रोजी आदेश जिल्हाधिकारी नाशिक यांनी पारित केले होते.
त्यानुसार प्रस्तुत प्रकरणात दातार कॅन्सर जेनेटिक यांचेकडून मुद्दे निहाय स्पष्टीकरण दिनांक 1 मार्च 2021 रोजी प्राप्त झाले. त्या स्पष्टीकरणमध्ये दातार कॅन्सर जेनेटिक्स यांनी प्रस्तुत प्रकरणात तांत्रिक अधिकाऱ्यांसह सदर लॅब ची जिल्हाधिकारी यांनी पाहणी करावी अशी विनंती केली व त्यानुसार प्रयोगशाळेचे कामकाज तसेच कोरोना व्यवस्थापनातील सांख्यिकी संदर्भातील कामकाज याची तांत्रिक माहिती असलेल्या अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात येऊन सदर तांत्रिक अधिकाऱ्यांसमवेत लॅब ची पाहणी दिनांक 2 मार्च 2021 रोजी करण्यात आली आहे. प्रयोगशाळेचे कामकाज हा तांत्रिक विषय असल्यामुळे या संदर्भात प्राप्त स्पष्टीकरणतील मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी व त्याची योग्यायोग्यता तपासण्यासाठी तसेच तांत्रिक पाहणीचे निष्कर्ष नोंदवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तांत्रिक पथकाचा अहवाल जिल्हाधिकारी यांना दिनांक 3 मार्च 2021 रोजी प्राप्त झाला आहे. तांत्रिक समितीने त्यांचे अहवालात शिफारशी केल्या आहेत व त्यावर दातार कॅन्सर जेनेटिक्स यांनी कार्यवाही करावी असे तांत्रिक अहवालात नमूद केलेले आहे. तसेच प्रयोगशाळा सुरू करण्यास अनुकूलता दर्शवली आहे.
तांत्रिक समितीचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी दातार कॅन्सर जेनेटिक्स यांच्याकडे पाठवण्यात आला आहे व स्वाब स्वीकृती व तपासणीचे कामकाज सुरू करणे बाबत त्यांना अनुमती देण्यात आली आहे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक