जगदलपूर (छत्तीसगड) – टिकरालोहंगा येथे राहणाऱ्या एका तरुणाने एकाचवेळी, एकाच मंडपात चक्क दोन मुलींशी लग्न केले आहे. या अनोख्या लग्नाला सर्वांनी उत्साहाने हजेरी लावली. या लग्नासाठी छापलेल्या पत्रिकेवर दोन्ही मुलींची नावे होती. त्यामुळे या अनोख्या लग्नाची सध्या देशभरात चर्चा होत आहे.
टिकरालोहंगा येथील चंदू मौर्य (२४) हा तरुण शेती करतो. सुरुवातीला तो करंजी येथील हसीना बघेल हिच्या प्रेमात पडला आणि नंतर एरंडवाल येथील सुंदरी कश्यप हिच्या. विशेष म्हणजे या दोघींनाही चंदू दुसऱ्या मुलीच्या प्रेमात आहे, हे माहित होते. त्याहीपुढे जाऊन तिन्ही कुटुंबांना या तिघांबद्दल ठाऊक होते.
अशातच जेव्हा लग्नाचा विषय निघाला, तेव्हा चंदूने दोघींशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला. मी या दोघींवरही प्रेम करतो, आणि कोणा एकीला सोडू इच्छित नाही, असे त्याने घरी सांगितले. आणि घरच्यांनी देखील या लग्नाला मान्यता दिली. विशेष म्हणजे, मुलींच्या घरच्यांची या लग्नाला मान्यता होती. कारण या दोन्ही मुलींनी आपण गुण्यागोविंदाने राहू, असे कबूल केले होते. हे तिघेही मुरिया आदिवासी जमातीचे असून त्यांच्याकडे एकापेक्षा अधिक लग्न करण्यास परवानगी आहे. लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी हे तिघे जण वर्षभर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.