वॉशिंग्टन – काही वेळा तांत्रिक बिघाड किंवा मानवी चुकांमुळे एखाद्या कंपनीला कोट्यवधीचे नुकसान सोसावे लागते. इमर्जंट बायोसोल्यूशन या सहयोगी कंपनीत कोरोना लस तयार करताना चाचणीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला मोठे नुकसान झाले आहे.
मानवी चुकांमुळे गोंधळ झाला, असे सांगण्यात येते. परंतु लस किती नष्ट झाली हे मात्र कंपनीने नमुद केलेले नाही, परंतु दीड कोटी लसींचे डोस कचऱ्यात गेल्याचे म्हटले जात आहे. अॅस्ट्रॅजेनेका आणि जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनी हे इमर्जेट बायोसोल्यूशनमध्ये स्वतःची कोरोना लस तयार करत आहेत. या ठिकाणी काम करणार्या कामगारांनी दोन्ही लसींमध्ये वापरल्या जाणार्या घटकांची एकत्र जोड दिल्यामुळे ही समस्या उद्भवली.
सध्या कोरोना महामारीवर मात करण्यासाठी जॉन्सन आणि जॉन्सनची लस महत्त्वपूर्ण मानली जाते, कारण त्यासाठी केवळ एक डोस आवश्यक असतो. दरम्यान,फायझरची लस सहा महिन्यांपर्यंत प्रभावी राहील, असे सांगण्यात येत आहे. अमेरिकन कंपनी आणि त्याच्या जर्मन भागीदार बायोनॉटॅकने 44 हून अधिक लोकांवर चाचणी घेतल्यानंतर लस अद्ययावत असल्याचा निर्णय जाहीर केला. दक्षिण आफ्रिकेच्या नव्या कोरोना प्रकारातही ही लस प्रभावी असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.