नवी दिल्ली – कोरोनावरील लस देण्यास शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. मात्र, या कार्यक्रमादरम्यान कोणी अफवा पसरवू नयेत म्हणून सरकार सर्वतोपरी काळजी घेत आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नुकतेच एक ट्वीट करून या संबंधातील सगळे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.
ही लस घेतल्यानंतर जर थोडा ताप आला, तर ते काही कोरोनाचे लक्षण नाही, असे हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे. काही जणांना इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी दुखू शकते, अंगदुखी होऊ शकते. पण यामुळे घाबरण्याचे कारण नाही. हे साईड इफेक्ट्स तात्पुरते असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोविड लस घेतल्याने नपुंसकत्व येण्याची अफवा आहे. हर्षवर्धन यांनी यावरही भाष्य केले आहे. ही लस घेतल्याने महिला किंवा पुरुषांना वांझपणा येण्याच्या या वृत्ताला कसलाही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे यासंदर्भात केवळ सरकारकडून दिल्या जाणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवा. अफवांकडे लक्ष देऊ नका, असे अवाहन त्यांनी केले आहे.