मुंबई – परळी (बीड) सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या पूजा चव्हाण (वय २२) हिने सोमवारी पुण्यात ८ फेब्रुवारीला इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांवर आरोप झाले. या प्रकरणाबाबत दहा ते बारा ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे.
बीडच्या परळीत राहणारी पूजा पुण्यात इंग्लिश स्पीकिंग कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. वानवडी इथल्या हेवन पार्कमध्ये ती चुलत भाऊ आणि मित्रासोबत राहत होती. सोशल मीडियामध्ये विशेषतः टिकटॉक अॅपवर ती ख्यातनाम होती. परंतु सोमवारी तिनं इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवलं.
भाजपचा आरोप
याप्रकरणी भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमधील एक मंत्र्यांवर आरोप करण्यात येत आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून पोलिसांनी यामधील सत्य तत्काळ बाहेर आणलं पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. हा मंत्री कोण याबाबत चर्चा सुरू असताना भाजपनं मंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येशी निगडित जवळपास १०-१२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून काही छायाचित्रे समोर आली आहेत. यामधून अनेक बाबी उघड झाल्या आहेत, पोलिस अजूनही याबाबत स्पष्टता देत नाहीत असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.