मुंबई – पत्रकार अर्णब गोस्वामी यांना ज्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक झाली आहे ते नक्की काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक खुलासे केले आहेत.
अक्षता नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्वय नाईक हे अलिबागच्या कावीर या गावचे राहणार आहेत. त्यांनी ५ मे २०१८ रोजी कावीर गावातील घरी आत्महत्या केली. याच घरात अन्वय यांच्या आई कुमुद यांचाही मृतदेह आढलला होता. अन्वय हे आर्किटेक्ट होते. त्यांनी रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. त्याचे पैसे अर्णब यांनी थकविले. त्यामुळेच अन्वय यांनी आत्महत्या केल्याचा आरोप अक्षता नाईक यांनी केला आहे. तशी रितसर तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली आहे. तसेच, अन्वय यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहीली होती. त्यात अर्णब गोसावी यांनी पैसे थकविल्याचे लिहील्याचे अक्षता यांनी सांगितले आहे. दोन वर्षांनंतरही न्याय मिळत नसल्याने अखेर अक्षता यांनी सोशल मिडियाच आपबिती कथन करणारा व्हिडिओ प्रसारित केला होता. तसेच, आपल्याया न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
अन्वय यांची मुलगी आज्ञा हिने काही महिन्यांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. रायगड पोलिस तपास करीत नसल्याची तक्रार तिने केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला.
रिपब्लिकच्या स्टुडिओचे संपूर्ण काम हे ६ कोटी ४० लाख रुपयाचे होते. यातील ८३ लाख रुपये मिळाले नाहीत. अन्वय यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितीश सार्डा या तिघांची नावे आहेत. अर्णब गोस्वामी सातत्याने माझ्या वडिलांना धमकी देत होते, तुला पैसे कसे मिळतात तेच पाहतो. तुझ्या मुलीचे करिअर उद्ध्वस्त करतो, अशी धमकीही अर्णब यांनी दिल्याचे आज्ञा हिने सांगितले आहे.