कामगार चळवळीतील कार्यकर्ता अन् अनुभवनिष्ठ कवी : नारायण सुर्वे
कविवर्य नारायण सुर्वे यांचा आज दि.१५ ऑक्टोबर रोजी जन्मदिन त्यानिमित्त विशेष लेख…
कविता ही व्यक्तीच्या तीव्र भावना मधून निर्माण होते. सुखात आणि दुःखात ती अधिक व्यक्त होत जाते. आठवणी, स्वप्न, आशा, आकांशा, एकटेपणा, भीती, दहशत रहस्य, आचार ,विचार आदि नानाविध गोष्टींमधून कविता जन्म घेत असते.
असे म्हटले जाते की , कवितेला कोणताही धर्म – पंथ नसतो अन् जातपातही नसते कविता ही व्यक्तिगत जीवनातही सुरू होऊन सार्वजनिक होते. अधिक व्यापक आणि व्यामिश्र सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न कवी कवितेतून करतो. कविता चांगली किंवा वाईट असू शकत नाही, ती असते फक्त कविता…
मराठी वाड्मयात कवितेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे . स्वातंत्र्यानंतर तिला अधिक बहर आला. जसे कवींचे व्यक्तिमत्व फुलत गेले, तशी कविता आणखीच फुलत गेली. यात प्रामुख्याने बालकवी, बा.भ. बोरकर, वसंत बापट, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर ,पुरुषोत्तम रेगे आदींच्या कवितांचा यात उल्लेख होतो. त्यानंतर नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, ना.ग. देशपांडे ना .धो .महानोर , कवी ग्रेस आदिंच्या कवितांची देखील प्रामुख्याने चर्चा होते. यात आणखी असेही म्हटले जाते की, लघुनियतकालिकांच्या समांतर प्रवाहाबाहेर राहूनही आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे आणि आधुनिक मराठी कवितेला मानवतावादी स्वर तीव्र करणारे महत्त्वाचे कवी म्हणून नारायण सुर्वे यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो.
नारायण सुर्वे यांची कविता सामाजिक बांधिलकी मानणारी तर आहेच. परंतु आधुनिक मूल्यांचा स्वीकार करून परंपरावादी व्यवस्थेची कठोर चिकित्सा त्यांच्या कवितेतून होताना दिसतो. त्यातही संयमी विद्रोहाचा अवलंब करणारी स्वातंत्र्यानंतरची महत्त्वाची कविता आहे, असे समिक्षकांना वाटते. कारण त्यात बोलीभाषेत प्रवाहीपणाचा दिसतो, तसेच सहज सुलभ पण अर्थपूर्ण शब्द त्यातून वाचकांच्या काळजाला भिडतात.
नेमकेपणाला हात घालून कधी भडक तर कधी थोडा संयमी स्वर लावत
प्रस्तापित व्यवस्था टाळून आपला मार्ग सुकर करणारी सुर्वे यांची कविता नवसाक्षरतेला वाट मोकळी करून देते. मुंबई नगरीत खेड्यापाड्यातून आलेल्या वाचकांना आदर्श वाटणारी म्हणून नारायण सुर्वे यांची कविता महत्त्वाची मानली जाते.
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात साहित्यामध्ये खूप मोठे बदल होत राहिले. स्वतंत्ररीतीने मानवी जीवनात जात, धर्म, पंथ, लिंग, वर्ग इत्यादी भेदांपासून वाड़मयाला मुक्त करण्याचे आणि समाजातील जगण्याची
प्रतवरी सुधारण्याचा एक स्वप्न साहित्यिकांना होते. पहिल्या दोन-तीन दशकांत ते स्वप्न उद्ध्वस्त झाले . कारण कालातंराने लोकशाहीने दिलेल्या अधिकारांमुळे जाती, धर्म, पंथ, वर्ण, लिंग इत्यादीचे विषमतेचे रंग अधिकच गडद होत गेले. त्यातून व्यक्तीची व्यक्तीशी तसेच समूहाची, जातीपातीची आणि धर्माची दरी निर्माण होऊ लागली. त्यामुळे साहित्यावर बंधने येऊ लागले असे वाटत होते. परंतु तरीही नारायण सुर्वे यांची कविता सामाजिक ,राजकीय आणि कामगार चळवळीत सक्रिय राहीली.
काही तुरळक कवी सोडल्यास त्या काळात ही विद्रोही आणि सामाजिक बांधीलकीची परंपरा सुर्वे यांनी जपली. त्यांच्या कवितेतून सामाजिक, राजकीय विचारधारेचे आकलन अधिक सुलभ होत जाते. नारायण सुर्वे यांची कविता प्रामुख्याने अनुभव निष्ठा आहे. नारायण सुर्वे हे आई कवितेमध्ये म्हणतात ,
जेव्हा तारे विझू लागत
भोंगे वाजू लागत
भोग्यांच्या दिशेने वळत
रोजी दिंडया जात चालत…
तर सुर्वे आपल्या मुंबई या कवितेत म्हणतात,
पटकुन खांद्यावर टाकून,
सह्याद्री घाट उतरून,
माझा बाप तुझ्या दारावर,
उभा राहिला श्रम घेऊन….
नारायण सुर्वे यांनी अनेक प्रकारच्या कविता लिहल्या. तसेच अन्य साहित्य प्रकार देखील हाताळले आहेत. त्यांची माझी आई,
ऐसा गा मी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, नारायण सुर्वे यांची कविता, सनद, तीन गुंड आणि सात कथा, दादर पुलाकडील मुले असे अनेक साहित्य प्रकार आहेत. त्यात सनद या काव्यसंग्रहात ते म्हणतात की , माझे संपूर्ण आयुष्य मुंबईत गेले . जुन्या काळी गिरण हा प्रमुख धंदा होता. प्रमुख संघटनांनी चळवळीतून गिरण कामगारांसाठी संप, आंदोलने केली. आता चित्र थोडे बदलले आहे. परंतु पूर्वी तशी परिस्थिती नव्हती, माझे आई वडील हे सकाळी चालत कामावर जात. तसेच वडील मात्र रात्र झाल्यावर परत येत , त्या आधी आई मात्र थोडे सांजवात असताना घरी चालत येत असे . घासलेटच्या दिव्याने आमचे घर उजळे. तेव्हा गिरणी मालक कामगारांना बारा-बारा तास कामावर राबवून घेत असत, कायदा कसला नव्हता तर आठ तासांचा दिवस व्हावा म्हणून संघर्ष चालू होता. हा संघर्ष मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
नारायण सुर्वे आणखी लिहितात की, आपण लोकांवर प्रेम करायला शिकले पाहिजे ,अंत:पूर्वक प्रेम केले पाहिजे त्यांच्यावर, मग पहा लोक असे भरभरून तुमच्याशी बोलू लागतात, तुमचे शब्द ते स्वतःच्या हृदयात जपून ठेवतात. कष्टकरी, कामगार, शेतकरी , शेतमजूर यांचा वारंवार उल्लेख सुर्वे कवितेतून करतात. कष्टकऱ्यांचे बोटे माती धुळीने माखलेली असली तरी मन आणि भावना मळकट नसते, असेही ते नमुद करतात.
नारायण सुर्वे यांची डोंगरी शेत हे एक अत्यंत गाजलेले गीत आहे. या सगळ्या घडामोडीतून स्वतःला व्यक्त करण्याचा उत्कट जाणिवेतून त्यांनी ते लिहिले. यापूर्वी त्यांनी काही गीते लिहिली होती. मनासारखे एक चांगले यावे असे त्यांना वाटत होते. त्यावेळी ते लिहितात की, ग्रामीण संदर्भ ज्यात कष्टाची व्यथा यावी, परंतु त्यात सच्चा अनुभव असावा. कष्ट करून कष्टाची भाकरी मिळणे कसे दुरापास्त होते, याचे भान मात्र झाले पाहिजे, ते या गीतातून साध्य झाले आहे. कष्टकरी स्त्रियांच्या सार्वत्रिक
दु : खाला वाचा फोडणारे व त्यांच्या गीतांच्या सहज-सोप्या गीतांच्या चाली सहजपणे कंठा करत गेले हे गीत आज घरोघरी पोहोचले.