मुंबई – कामगारांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील हे उपस्थित होते. असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ, बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य, घर कामगारांची नोंदणी व त्यांच्या योजना, यंत्रमाग-ऊसतोड कामगार, रिक्षाचालक व हाकर्स यांच्यासाठी मंडळाची स्थापना, स्थलांतरित कामगार कायद्याची अंमलबजावणी, कामगार विषयक त्रिपक्षीय समित्यांचे गठण, केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण इत्यादी मुद्द्यावर विस्ताराने चर्चा झाली. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने डॉ. डी. एल. कराड, विश्वास उटगी, संजय वढावकर, एम. ए. पाटील ,दिवाकर दळवी यांनी कामगारांच्या समस्या मांडल्या. कामगारांच्या समस्या याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पवारांना व समितीला दिले.