दिंडोरी – तालुक्यातील कादवा म्हाळुंगी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता अनिल गांगोडे यांची तर उपसरपंचपदी शिलाबाई भास्कर आहेर यांची गुप्त मतदान घेवून निवड करण्यात आली. यावेळी सरपंच व उपसरपंच पदासाठी दोन अर्ज आले त्यात प्रत्येकी पाच मते मिळवत सरपंच पदी सौ.सविता गांगोडे उपसरपंच पदी सौ. शिलाबाई आहेर विजयी झाल्या. यावेळी सातही सदस्य हजर होते.
कादवा म्हाळुंगी येथील सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक १५ फेब्रुवारीला घेण्यात येणार होती. मात्र गावात तणावाचे वातावरण तयार झाले. ग्रामस्थांनी सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यात मज्जाव केला होता. विहित वेळेत एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी कोठावदे यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ फेब्रुवारीला निवडणूक घेण्याचे जाहीर केले.
त्यानुसार आज पोलिस बंदोबस्तात सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. यावेळी डि. वाय. एस .पी. अमोल गायकवाड व दिंडोरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अनिलकुमार बोरसे यांनी चोख पोलिस बदोबस्त ठेवला. निवडणूक शांततेत पार पडली. यावेळी सरपंच सौ.सविता गांगोडे व उपसरपंच शिलाबाई आहेर यांनी सर्व शासकीय यंत्रणेचे आभार मानले.