दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याने यंदा गाळप केलेल्या उसाचे बिलापोटी दुसरा हप्ता रुपये २४० असे एकूण २१२५ ऊस उत्पादकांच्या बँक खाती वर्ग केल्याची माहिती कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली.
कादवा सहकारी साखर कारखान्याने यंदाचे गळीत हंगामात ८६ दिवसात २२७७५२ मेट्रीक टन ऊसाचे गाळप होत सरासरी साखर उतारा १०.४९ मिळत २३६१२५ क्विंटल साखर निमिर्ती झाली आहे. गेल्यावर्षी २२ जानेवारीस १०२७१६ मेट्रीक टन गाळप झाले होते. यंदा दुप्पटहुन अधिक गाळप झाले आहे .यंदा कोरोना मुळे मिठाई दुकाने बंद राहिल्याने साखर विक्रीत मोठी घट झाल्याने गेल्या वर्षीचा साठा शिल्लक आहे. अजूनही साखरेला अंत्यत कमी भाव मिळत असून साखरेची विक्री कमी प्रमाणात होत आहे .भुस्सा मळी चे ही भाव कमी असल्याने यंदा एफआरपी रक्कम कशी द्यायची हा प्रश्न राज्यातील साखर कारखान्यांपुढे उभा राहिला आहे. सरकारने साखर निर्यात धोरण जाहीर केले आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्यातीस अडचणी येत आहे. शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान येणे बाकी आहे ते मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे.
अत्यंत बिकट स्थितीत सर्व साखर कारखाने वाटचाल करीत असताना कादवाने उसाचे बिलापोटी पहिला हप्ता १८८५ दिला होता. आता ३१ डिसेंबर पूर्वी गाळप झालेल्या ऊस बिलापोटी २४० दुसरा हप्ता दिला आहे. १ जानेवारी पासून गाळप झालेल्या उसबीलापोटी पहिला हप्ता २१२५ अदा केला जाणार आहे. कादवाने दरवर्षी लवकरात लवकर संपुर्ण एफआरपी अदा केली असून यंदाही जसजशी आर्थिक उपलब्धता होईल तसतसे पेमेंट अदा करत लवकरात लवकर एफआरपी अदा करण्याचा प्रयत्न राहील. कार्यक्षेत्रात ऊसतोड वाढविण्यात आली असून यंदा २७०० ते ३००० दरम्यान प्रतिदिन गाळप सुरू असल्याने वेळेत सर्व ऊस तोड पूर्ण होणार आहे.जास्तीत जास्त गाळप झाल्यास उत्पादन खर्च कमी होत कारखान्यास फायदा होणार आहे. केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालू शकणार नाही त्यामुळे केंद्र शासनाने इथेनॉल प्रकल्पास चालना दिली असून कादवा ने ही इथेनॉल डीस्टीलरी प्रकल्पाची तयारी सुरू केली असून त्याबाबत निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहे लवकरच प्रत्यक्ष प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सुरू केलेल्या ठेव योजनेस सभासदांनी चांगला प्रतिसाद दिला आहे तरी कारखान्याचे हितासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे,व्हा चेअरमन उत्तमबाबा भालेराव यांनी केले आहे यावेळी सर्व संचालक,कार्यकारी संचालक हेमंत माने,सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.