नाशिक – सरकारी योजनेसाठी कागदपत्रे महत्त्वाची असली तरीही, आधी रुग्णावरील उपचाराला प्राधान्य द्या. कागदपत्रांमुळे कुणी गरजू, गरीब रुग्ण उपचारांपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन धर्मादाय सहआयुक्त जयसिंग झपाटे यांनी केले. पंचवटीतील श्री सप्तश्रुंगी आयुर्वेद महाविद्यालयात धर्मादाय रुग्णालय योजनेसंदर्भात आयोजित बैठकीत झपाटे बोलत होते. व्यासपीठावर सहायक धर्मादाय आयुक्त कृष्णा सोनवणे, मविप्र संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते, तुलसी आय हॉस्पिटलचे सीईओ डी. के. झरेकर, श्री सप्तश्रुंगी हॉस्पिटलच्या विश्वस्त हिमगौरी आडके आदींसह शहरातील विविध धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोरोनाकाळात खासगी, सरकारी, निमसरकारी रुग्णालयांबरोबरच धर्मादाय हॉस्पिटल्सनेदेखील उल्लेखनीय कार्य केले आहे, असे सांगतानाच झपाटे यांनी विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधले. रुग्णालयांना येणाऱ्या समस्या, त्यांचे प्रश्न वेळीच सोडवण्यासाठी संघटना गठीत करण्याचे आवाहन केले. उत्पन्नाचा दाखला नसेल तर लगेच उपचाराला नकार देऊ नका. ठराविक मुदतीत कागदपत्र दिले नाहीत तर आमच्या कार्यालयाला कळवा. उत्पन्न दर्शवण्यासाठी भगवे आणि पिवळे रेशनकार्ड पुरेसे आहे. त्यानंतरही गरज भासली संबंधित तहहसीलदार, तलाठ्यांशी पत्रव्यवहार करू शकता, असेही ते म्हणाले. जोपर्यंत तुम्ही तुमची साथ देत नाहीत, तोपर्यंत जगाची साथ लाभत नाही आणि जेव्हा तुम्ही तुमच्या पाठीशी उभे राहता, तेव्हा तुम्हाला कुणाच्या पाठबळाची गरज भासत नाही, असे सांगत धर्मादाय सहआयुक्तांनी प्रत्येकाने खंबीरपणे वाटचाल करण्याचा कानमंत्र दिला.
सहायक धर्मादाय आयुक्त के. एम. सोनवणे यांनी सरकारी योजनांची माहिती देतानाच रुग्णालयांना लागू असलेल्या नियमांसंदर्भात मार्गदर्शन केले. राखीव बेड्स, उपलब्ध योजना, याची माहिती दर्शनी भागात लावा. रुग्णाला आवश्यक ती पुरेशी माहिती देत अखंड रुग्णसेवेचा वसा कायम ठेवा, असे आवाहन केले. झरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक हिमगौरी आडके यांनी केले. नामको ट्रस्टचे सचिव शशिकांत पारख यांनी आभार मानले.
देखरेख समितीवर शशिकांत पारख यांची निवड
मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या नाशिक जिल्हा आरोग्य देखरेख समितीवर धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी म्हणून नामको चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी शशिकांत पारख यांची निवड झाल्याचे धर्मादाय सहआयुक्त झपाटे यांनी बैठकीदरम्यान जाहीर केले. शहरातील रुग्णालयांच्या संपर्कात राहून पारख यांनी रुग्णालयांना येणाऱ्या अडचणी व प्रश्न थेट आपल्याकडे मांडावेत, असेही झपाटे यांनी सांगितले.