जिल्हाध्यक्षॲड.रविंद्र पगार यांचे माजी कृषिमंत्री खा.शरद पवार यांना साकडे
नाशिक : कांदा अत्यंत किरकोळ भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. केंद्र सरकारने कांद्याला किमान २००० रुपये इतका हमीभाव देणे गरजेचे आहे. तरी आपण आपल्या वरिष्ठ पातळीवर चर्चा करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार यांनी माजी कृषिमंत्री खा.शरद पवार यांना घातले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे आयोजीत प्रशासकिय आढावा बैठकीसाठी आलेले खा.शरद पवार यांना वरील मागणीचे निवेदन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले आहे. याशिवाय नाशिक जिल्ह्यात युरिया खताची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे आपल्या रेल्वे मंत्रालय व RCF यांच्यासमवेत चर्चा करून युरियाच्या २ रेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्याव्यात.
मका व अन्य पिकांवर लष्करी अळीचे संकट उभे राहिले आहे. तसेच डाळिंबावर तेल्या व प्लेग रोगाने थैमान घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण देण्यात यावे. शेती पूरक उद्योगांकडे शेतकरी वळत असल्याने दुधाला योग्य ते अनुदान देण्यात यावे. लॉकडाऊनमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. तरी थकीत पिक कर्जावरील व्याज रद्द करावे आदी मागण्या देखील खा.शरद पवार यांच्याकडे करण्यात आल्याचे ॲड. पगार यांनी सांगितले. पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांना देखील निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.
प्लाझ्मा कलेक्शन सेंटर
नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कोरोना मधून बरे झालेल्या व्यक्तींच्या प्लाझ्मातून उपचार घेत असलेल्या रुग्णांना प्लाझमा दिल्यास ते लवकर कोरोना मुक्त होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात तालुकावार प्लाझ्मा कलेक्शन सेंटर सुरु करावेत अशी मागणी देखील जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी केली आहे.