नाशिक – केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी केल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने कांद्याच्या माळा घालून आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून दिनांक ४ जून २०२० रोजी कांदा हे पिक वगळले होते. मात्र तीन महिन्यातच कांद्यावर पुन्हा निर्यात बंदी घालून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. लाॅकडाऊन च्या अतिशय संकट काळात मोठ्या कष्टाने शेतकर्याने कांदा पिकवला होता. दोन तीन दिवसापासून कांद्याला चांगला भाव मिळायला लागला होता. तेवढ्यात केंद्र सरकारने कांद्यावर पुन्हा निर्यातबंदी घोषित केली यामुळे शेतकरी देशोधडीला लागेल, अशी भीती राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.
कोरोना रोगा सारख्या महाभयंकर संकटात स्वताःच्या आणि कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याने लोकांसाठी भाजीपाला पिकवून शहरातील नागरिकांना अन्न धान्यांची सोय उपलब्ध करून दिली. शेतकऱ्याने पिकवलेला कांद्याला दोन दिवसापासून चांगला भाव मिळायला लागला तेवढ्यात कांद्यावर निर्यात बंदी घालून बळीराजाच्या तोंडातला घास केंद्र सरकारने हिरावून घेतला त्यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी पसरली आहे. भविष्यात यामुळे शेतकरी आत्महत्या वाढतील अशी भीती देखील वाटते. तेव्हा केंद्र सरकारने तत्काळ निर्णय घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी मागे घ्यावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
मोदी सरकार हाय हाय, कांद्यावरील निर्यात बंदी मागे घ्या, मागे घ्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, अशा घोषणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाशिक शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी कार्याध्यक्ष सुषमा पगारे, पश्चिम विधानसभा अध्यक्ष पुष्पा राठोड, विभागीय अध्यक्ष रूपाली पठारे, अपेक्षा अहिरे, शहर पदाधिकारी मिनाक्षी गायकवाड, मंगला मोरे, लता चौधरी, सुजाता गाढवे, भारती चित्ते आदी महिला उपस्थित होत्या.