नाशिक – जिल्ह्यातल्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे. मात्र लाल कांद्याचे भाव वाढत आहेत. तर, नाशिक बाजार समितीत कोथिंबीर, मेथी आणि शेपू या भाज्यांना एक ते तीन रुपये प्रति जुडी असा अत्यल्प भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात जुड्या तशाच फेकून दिल्या.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी १ हजार ५६१ ते जास्तीत जास्त ४ हजार २३०, तर सरासरी ३ हजार ३०० रुपये असा भाव मिळाला.
काल या कांद्याला ३ हजार ४०० रुपये सरासरी भाव मिळाला होता. अर्थात लाल कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. काल लाल कांद्याला सरासरी ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता. आज मात्र किमान भाव २ हजार १ ते जास्तीत जास्त ४ हजार ९०० रुपये, तर सरासरी ४ हजार ३०० रुपये भाव मिळाला.
दरम्यान, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह इतर बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे भाव घसरू लागले आहेत.