हितेश देसाई, लासलगाव
महाराष्ट्रातील एकही बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद राहणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे. ‘बंद बंद बंद’, अशाप्रकारे जो काही मेसेज राज्यभरात सोशल मीडियावर फिरत आहे त्या मेसेजचा आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा कुठलाही संबंध नाही. बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवल्याने परत जेव्हा बाजार समित्या सुरू होतील तेव्हा कांद्याची एकदम आवक होऊन सरकारचा कांद्याचे भाव पाडण्याचा हेतू उलट सफल होईल. कांद्याचे लिलाव रोजच्या रोज व सुरळीत पद्धतीनेच सुरू राहावे, हीच महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची अधिकृत भूमिका असल्याचे दिघोळे यांनी सांगितले आहे.
केंद्र सरकारने कांद्याला निर्यात बंदी करून परदेशातील कांदा आयात करण्याचा आदेश काढून तसेच कांद्याचे किरकोळ साठी २ टनाचे आणि होलसेल साठी २५ टनांचे स्टॉक लिमिटची मर्यादा घालून दिल्याने कांद्याचे दर घसरले आहेत. परंतु दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तसेच चाळीतील कांद्याची सड होण्याचे प्रमाण वाढलेले असल्याने राज्यभरातील सर्व कांदा उत्पादकांनी आपला कांद्याची चांगली प्रतवारी करून अगदी थोडा थोडा कांदा बाजार समित्यांमध्ये घेऊन जायचं आहे, असे प्रवक्ते शैलेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.
फक्त कांदा उत्पादक बांधवांनी आपल्या जवळच्या किंवा सोयीच्या बाजार समित्यांमध्ये कांदा घेऊन जात असतांना तो अगदी थोडा थोडा घेऊन जावा. जेणेकरून बाजार समितीमध्ये कांद्याची एकदम आवक होणार नाही व सरकारला कांद्याचे दर पाडण्याचे जे काही षडयंत्र करायचे आहे ते यशस्वी होणार नाही. महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू राहतील याची राज्यभरातील सर्व कांदा उत्पादकांनी नोंद घ्यावी. केंद्र सरकारच्या कांदा आयातीच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यभर मोठे आंदोलन करून विरोध केला जाईल परंतु बाजार समित्यांचे कामकाज बंद राहणार नाही. पाकिस्तानने कांदा निर्यात बंदी केल्याने कांद्याची जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी भारताने कांदा निर्यात खुली करावी यासाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उद्या सोमवारी (२६ ऑक्टोबर) रोजी सर्व घटक जसे की मार्केट कमेटी सभापती, सचिव, व्यापारी हमाल, मापारी यांच्याशी चर्चा करतील, असे शिवाजीराव पवार यांनी सांगितले आहे.